आयएसपी प्रेस गेट वर अतिरेकी हल्ला...चार अतिरेक्यांचा खात्मा, एक जेरबंद
आयएसपी प्रेस गेट वर अतिरेकी हल्ला...चार अतिरेक्यांचा खात्मा, एक जेरबंद
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): आठवड्याचा पहिला दिवस… संध्याकाळी साडेपाच वाजताची वेळ. दिवसपाळीचे कामगार घरी जाण्याच्या तयारीत, तर रात्रीच्या पाळीचे कामगार कामावर हजेरी लावण्यासाठी गेटवर गर्दी करत होते. एवढ्यात अचानक सायरनचा तीव्र आवाज घुमला आणि लगेचच कानी पडू लागला गोळीबाराचा आवाज. क्षणभर सर्वत्र गोंधळ उडाला. कामगार जीव वाचवण्यासाठी सैरभैर पळू लागले. जणू काही सीमाभागातील युद्धभूमी नाशिकरोडवरच उभी ठाकली होती. हा प्रसंग कोणत्याही सरहद्दीवरील लष्करी ठिकाणी घडलेला नव्हता, तर नाशिकरोड आयएसपी मुद्रणालयाच्या आवारात घडत होता.

सशस्त्र अतिरेक्यांचा एक गट ग्रीन गेट आणि वर्कशॉपकडे सरसावला होता. हल्लेखोरांनी बेधडक फायरिंग सुरू केली. जवानांनी तात्काळ प्रत्युत्तर देत अतिरेक्यांना रोखले. क्षणोक्षणी थरार वाढत होता. एका बाजूला गोळीबाराचे आवाज, तर दुसऱ्या बाजूला बॉम्ब शोधक पथक, बॉम्ब निकामी पथक, डॉग स्क्वॉड, अग्निशामक पथक आणि डॉक्टरांची धावपळ सुरू होती. घटनास्थळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) जवान रणांगणात उतरल्यानंतर काही वेळातच चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला, तर एकाला जेरबंद करण्यात यश आले. या कारवाईदरम्यान एक कामगार जखमी झाला. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्त्यात 'इतकी' वाढ

या संपूर्ण कारवाईत आयएसपीचे प्रबंधक लोकेश मीना, सीआयएसएफ कमांडर ब्रीज भूषण, डेप्युटी कमांडर ऋग्वेद सावंत, सहायक कमांडर विजय सोनवणे, किर्ती कुमार, प्रदीप वसावे, निर्मित लांबोस, जोगेश, रुपेश कुमार, अरविंद जाधव, संतोष गवांडे आणि विजय कुमार यांनी थेट नेतृत्व केले. यावेळी ७५ जवानांचा ताफा सज्ज होता. त्वरित प्रतिक्रिया दलाचे एस.के. चव्हाण यांच्यासह ८ जवान, दहशतवादी विरोधी शाखेच्या प्रगती जाधव यांच्यासह १० जवान, अतिरेकी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह २ जवान, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनिरीक्षक जितेंद्र माळी, विशाल साळुंके, अर्चना सोनवणे, विनोद भुसे, सचिन गवते यांनीही आपली जबाबदारी पार पाडली.

बॉम्ब शोधक पथकाचे निरीक्षक किर्ती पाटील, उपनिरीक्षक ज्ञानदेव राणे, भूषण खैरनार, अजय भविष्कर, अनिल केदारे, ज्योतीराम गायकवाड, फिरोज मुलानी, चंद्रकांत कुमावत, किरण निकम आणि श्वान ‘लकी’ यांनीही सहभाग घेतला. चकमक थांबल्यावर आणि परिसर सुरक्षित झाल्यावरच खरी गोष्ट उघड झाली की हा संपूर्ण प्रसंग प्रत्यक्ष हल्ला नसून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित मॉक ड्रिल होता.

संभाव्य हल्ल्याला तोंड देण्याची सज्जता आणि जलद प्रतिसादाची क्षमता दाखवण्यासाठी हा सराव करण्यात आला होता. मात्र, शेवटपर्यंत ‘हल्ला’ समजून धास्तावलेल्या कामगारांसह नाशिकरोडकरांनी हा मॉक ड्रिल असल्याचे कळताच सुटकेचा निःश्वास सोडला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group