नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): खुनाच्या आरोपातून मध्यवर्ती कारागृहातून सुटलेल्या 'चिमण्या भाई' च्या समर्थनार्थ सशस्त्र रॕली काढणे व त्याचे रील काढून व्हायरल करणे भाईसह समर्थकांना भोवले आहे. पोलिसांनी यातील १७ जणांना अटक करत वरात तर काढली शिवाय या वरातीचा व्हिडिओ काढत तो व्हायरल करीत नाशिकरोड पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश सोनवणे उर्फ चिमण्या, प्रतीक सोनवणे, यश गीते, मोनू सोनवणे, उमेश फसाळे, प्रमोद सावडेकर, श्रावण पगार, सुमित बगाटे, मुन्ना साळवे , रामू नेपाळी व इतर १५ ते २० अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात महेश सोनवणे उर्फ चिमण्या हा तो मध्यवर्ती कारागृहात होता. २० सप्टेंबरला तो कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या समर्थकांनी रॕली काढली. प्रतीक सोनवणे, यश गीते, मोनू सोनवणे, उमेश फसाळे ,प्रमोद सावडेकर, श्रावण पगारे ,सुमित बगाटे ,मुन्ना साळवे, रामू नेपाळी व इतर अनोळखी 15 ते 20 अनोळखी इसम यांनी रॕली काढत व सोबत धारदार शस्त्र बाळगून चार चाकी व दुचाकी वाहनावर जाताना रस्त्यावर येणारे जाणारे सामान्य लोकांना व वाहतुकीस मज्जाव करून त्यांचे अंगावर धावून जाऊन दहशत निर्माण केली होती. तसेच त्याचे रील व्हायरल केले होते.
त्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या भाईगिरीची दखल घेत १७ जणांना ताब्यात घेतले. त्यांची रॕली मार्गावर वरात काढत अशी भाईगिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला. पोलीस कर्मचारी अरूण गाडेकर यांच्या तक्रारींन्वये संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.