दैनिक भ्रमर ( इगतपुरी प्रतिनिधी ) : वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गौळाणे गावात बुधवारी एक पिकअप वाहन चोरीला गेले होते. याबाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा दाखल होता. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीनुसार चोरलेले वाहन समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जात असल्याचे समजले. त्यानुसार ह्या वाहनाचा सिनेस्टाईल थरारक पाठलाग करून वाहन व चार आरोपी ताब्यात घेण्यात आले.
यातील आरोपीकडून हा गुन्हा केल्याची कबुली देण्यात आली. पोलिसांनी पिकअप वाहन आणि मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा तात्काळ उघडकीस आणला आहे. अवघ्या आठ तासात हा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांचे गुप्त माहितीनुसार पोलीस अंमलदार प्रविण काकड, रावसाहेब कांबळे, योगिता काकड, संतोष दोंदे यांनी ही कामगिरी केली. अनिल रमेश पाल वय १९, रमेश लालजी पाल वय २३, दीपक श्रीविजय पाल वय २१, कमलेश राजबली पाल वय १९ सर्व राहणार मिर्जापूर, ता. मढ्याल ( उत्तर प्रदेश ) अशी आरोपींची नावे आहेत.