नाशिक : महिलांशी अश्लील चाळे अन करायचा पाठलाग; माथेफिरू पंचवटी पोलिसांच्या ताब्यात
नाशिक : महिलांशी अश्लील चाळे अन करायचा पाठलाग; माथेफिरू पंचवटी पोलिसांच्या ताब्यात
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : नाशिकच्या दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सोशल मीडियावर एक मजकूर व्हायरल झाला होता. त्यामध्ये येथील पडक्या इमारतीत वास्तव्यास असलेला एक पुरुष महिलांच्या मागे धावत असल्याचा तसेच अंगावरील कपडे काढून अश्लील कृती व हल्ल्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकारांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

व्हायरल झालेला मजकूर तसेच काही महिलांना आलेला अनुभव यामुळे या परिसरातून ये-जा करताना महिलांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती. संशयितावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातून होत होती. या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी मेरी परिसरात गस्त घालणाऱ्या महिला बीट मार्शलला याबाबत सूचना दिल्या. 

महिला पोलिस अंमलदार रोहिणी साबळे आणि रोहिणी भोईर या गस्त घालत असताना याच परिसरात एक संशयित इसम फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी एक शाळकरी मुलगी रडत येताना दिसली. तिने पोलीस अंमलदारांना सांगितले की, एक व्यक्ती घाणेरडे चाळे करत तिच्या मागे लागला होता. 

तात्काळ महिला पोलिसांनी धाव घेऊन स्थानिक वॉचमन सोमनाथ नेरकर आणि सागर मनोज कदम यांच्या मदतीने संशयिताला पकडले. त्यानंतर गुन्हे शोध पथकाला तातडीने घटनास्थळी बोलावले. यानंतर पंचवटी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. अधिक तपास आता पोलिसांकडून सुरु आहे. या कारवाईमुळे महिला पोलिसांचे कौतुक होत असून महिलांनीही सुटेकचा निश्वास सोडला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group