नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- बंद घराच्या लोखंडी सेफ्टी दरवाजाचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातून सुमारे 17 लाखांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार सातपूर कॉलनीत घडला.
फिर्यादी कुमारसिंग मगनसिंग परदेशी (रा. समतानगर, सातपूर कॉलनी, नाशिक) हे दि. 24 ते 28 सप्टेंबरदरम्यान बाहेरगावी गेले होते. त्यांच्या बंद घराच्या लोखंडी सेफ्टी दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घराच्या हॉलमधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यात असलेले फिर्यादीच्या सेवानिवृत्तीच्या पेन्शन फंडाचे 4 लाख 21 हजार रुपये, शेतीव्यवसायातून मिळालेले 6 लाख 48 हजार रुपये, घरभाडे व गाळेभाड्यातून मिळालेले दोन लाख 46 हजार रुपये, आईवडील मयत झाल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेले 2 लाख 10 हजार रुपये, तसेच आईवडिलांच्या दागिन्यांचे दोन्ही भावांच्या आपापसातील व्यवहारातून मिळालेले 1 लाख 50 हजार रुपये अशी एकूण 16 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नळकांडे करीत आहेत.