नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) – वडनेर गेट परिसरातील आर्टिलरी सेंटरमध्ये वनविभागाने आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईनंतर या परिसरात पकडण्यात आलेल्या बिबट्यांची संख्या सहावर पोहोचली आहे.माजी नगरसेवक केशव पोरजे व स्थानिक पातळीवर झालेल्या पाठपुराव्यामुळे आणि वनविभागाच्या नियोजित कार्यपद्धतीमुळे ही कारवाई शक्य झाल्याचे समजते.

या परिसरात यापूर्वी बिबट्याने दोन निरागस बालकांना आपली शिकार करून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर वनविभागाने परिसरात टप्प्याटप्प्याने पिंजरे लावून बिबट्यांना पकडण्यासाठी मोहिम राबवली. पहाटेच्या सुमारास लावलेल्या एका पिंजऱ्यात सहावा बिबट्या अडकला. हा परिसर सलग सहा बिबट्यांना पकडण्यात यशस्वी ठरल्याने आता राज्यातील संवेदनशील क्षेत्रांपैकी एक मानला जाऊ लागला आहे.
दरम्यान, वनविभागाने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला आहे. अनावश्यकपणे रात्री बाहेर फिरणे टाळणे, घराबाहेर उरलेले अन्न वा पशुखाद्य खुले न ठेवणे आणि कोणतेही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बिबट्यांचा वावर अजूनही पूर्णपणे थांबलेला नसल्याने खबरदारी आवश्यक असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.