त्र्यंबकरोडवरील जमिनी ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या नाशिक विकास प्राधिकरणाच्या अधिकार्यांच्या कारवाईला नागरिकांनी जोरदार विरोध केला. या विरोधाला न जुमानता विकास प्राधिकरणाने कारवाई सुरू केलेली आहे. परंतु येथील शेतकरी संतापले असून ही कारवाई थांबवण्यासाठी त्यांनी रास्ता रोको करुन विरोध केला. यामुळे परिसरत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबक रस्ता विकसित व्हावा याकरीता त्र्यंबकरोडवरील रस्त्यालगत असलेली जागा नाशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ताब्यात घेऊन त्यातून हा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दृष्टीने नाशिक विकास प्राधिकरणाने पावले उचलण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी माजी आयुक्त माणिकराव गुरसळ यांनी येथील शेतकर्यांना आणि लगत असलेल्या ग्रामस्थांना सर्व माहिती देऊन मोबदला देण्यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर त्यांची बदली झाली आणि त्यांचा पदभार जलज शर्मा यांच्याकडे देण्यात आला.
त्यावेळी येथील शेतकरी, ग्रामस्थ यांनी नाशिक विकास प्राधिकरण कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले होते. तसेच मागच्या आठवड्यामध्ये त्र्यंबकराज लॉन्स या ठिकाणी नाशिक-त्र्यंबकरोडवरील शेतकरी, ग्रामस्थ यांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापूर्वीच विकास प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी येथील शेतकर्यांना आज जमिनी ताब्यात देण्याबाबत सांगितले होते. तशा नोटीसाही त्यांना देण्यात आल्या होत्या.
नाशिक विकास प्राधिकरणाने दिलेली मुदत संपल्यानंतर आज सकाळी नऊ वाजता प्राधिकरणाच्या तहसीलदार सुचिता पवार तसेच विभाग तीनचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि नाशिक विकास प्राधिकरणचे अधिकारी या नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील जकात नाक्याजवळ पोहोचले. या ठिकाणाहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली; मात्र ग्रामस्थांना आणि शेतकर्यांना याची माहिती मिळताच शेतकरी व ग्रामस्थांनी विरोध केला. काही लोक अतिक्रमण तोडण्यासाठी येत असलेल्या घरावर चढून विरोध करत होते. पण त्यांना प्रशासनाने समजावून सांगितले.
अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई त्वरीत थांबवावी यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी जकात नाक्यासमोर रास्ता रोको करीत विरोध केला. येथे आ. हिरामण खोसकर हे दाखल झाले त्यांनी ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, प्रशासन अधिकार्यांशी चर्चा केली. अधिकारी काही ऐकण्यास तयार नसल्यानेे हतबल झालेले आ. खोसकर निघून गेले.
या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांनी देखील प्रशासनाच्या कारवाईला विरोध केला आणि ही कारवाई चुकीची असल्याचे सांगून अतिक्रमण काढण्याचे त्वरित बंद करण्याची मागणी त्यांनी केली. कैलास खांडबहाले यांनीही यास विरोध केला, नागरिकांना असे बेघर करणे चुकीचे आहे, त्यांची जागा आहे त्यांना ती मिळालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
वाढवणे येथील आश्रमाचे राहुल महाराज यांनी यावेळी प्रशासनाशी चर्चा करताना सांगितले की, मुळात या रस्त्यावर अतिक्रमण नाही. जे अतिक्रमण होते ते बारा वर्षांपूर्वी जेव्हा रस्ता विकसित झाला त्यावेळी ते काढले गेले आहे. आता मूळ नागरिक या ठिकाणी वास्तव्य करीत आहे, त्यांचे नुकसान करू नका त्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी राहुल महाराज यांनी केली.