नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - सायबर भामट्यांनी दोन वृद्धांना आपल्या जाळ्यात अडकवत त्यांना सात कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पहिल्या घटनेतील वृद्धाला 6 कोटी 25 लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. या वृद्धाला सायबर भामट्याने फोन करून सांगितले, की तुमच्या आधार कार्डाचा वापर करून सिमकार्ड घेण्यात आले आहे. या सिमकार्डाच्या माध्यमातून अनेकांना अश्लील मेसेजेस व कॉल करून ब्लॅकमेल करण्यात येत आहे. तुम्ही याबाबत आम्ही सांगितलेल्या अॅपवर ऑनलाईन कम्प्लेंट करा, तसेच तुमच्या मोबाईल नंबरद्वारे मनी लॉण्डरिंग प्रकरणातही विविध चुकीचे व्यवहार करण्यात आले आहेत.
त्याबाबतदेखील आम्हाला खात्री करायची आहे. आम्ही सांगितलेल्या खात्यावर तपासणी करण्यासाठी तुमच्या खात्यातील सर्व रक्कम त्या खात्यात वर्ग करा. आम्ही मनी लॉण्डरिंगमध्ये खरोखर तुमचा सहभाग आहे का, याची तपासणी करू. काही आढळले नाही, तर तुमचे सर्व पैसे पुन्हा तुमच्या खात्यावर ट्रान्स्फर करू. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या वृद्धाने त्यांच्या खात्यातील 6 कोटी 25 लाख रुपये ट्रान्स्फर केले.
दुसर्या घटनेत वृद्धाला 72 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. सायबर भामट्याने फोन करून वृद्धाला सांगितले, की तुमच्या आधार कार्डावरून कॅनरा बँकेचे क्रेडिट कार्ड मुंबईला काढण्यात आले आहे. या कार्डाद्वारे मोठ्या प्रमाणात चुकीचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. तुम्हाला डिजिटल अॅरेस्ट करून कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तुमच्या खात्यातून 72 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. तुम्ही त्वरित या खात्यात 72 लाख रुपये भरा. नाही तर सीबीआयची टीम पाठवून तुम्हाला अटक करण्यात येईल, अशी भीती दाखविण्यात आली. त्यामुळे त्या वृद्धाने त्वरित 72 लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्स्फर केले. या दोन्ही गुन्ह्यांची नोंद ऑनलाईन करण्यात आली असून, पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.