नाशिक : तीन घरफोड्यांमध्ये चार लाखांचा ऐवज लंपास
नाशिक : तीन घरफोड्यांमध्ये चार लाखांचा ऐवज लंपास
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोकड असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.



घरफोडीचा पहिला प्रकार सिडको येथे घडला. फिर्यादी देशी राम सावळीराम चव्हाण (रा. सिद्धिविनायक कॉलनी, सावतानगर, सिडको) यांच्या घराच्या किचनच्या खिडकीचे दोन गज कापून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील बेडरूरमध्ये लाकडी कपाटातील लॉकर उघडून त्यात असलेली 70 हजार रुपयांची रोकड घरफोडी करून चोरून नेली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार आवारे करीत आहेत.




घरफोडीचा दुसरा प्रकार एकलहरा गेट येथे घडला. फिर्यादी रामकृष्ण भागप्पा शिंदे (रा. सिद्धार्थनगर, एकलहरा गेट, नाशिकरोड) यांच्या राहत्या घराच्या लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरात असलेली दोन लाख रुपयांची रोकड, 11 हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स, 44 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, 44 हजार रुपये किमतीची मुलीची चेन, 2 हजार 400 रुपये किमतीच्या चांदीच्या तोरड्या व 1100 रुपयांची सोन्याची अंगठी असा 3 लाख 2 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.

घरफोडीचा तिसरा प्रकार देवळाली कॅम्प येथे घडला. याबाबत महेंद्र बाबूलाल कापुरे (रा. आनंदनगर, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की देवळाली कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूलच्या सायन्स लॅबच्या पाठीमागील खिडकीवरील जाळी तोडून अज्ञात चोरट्याने शाळेत प्रवेश केला. यावेळी तेथे असलेले दोन मॉनिटर, दोन सीपीयू, दोन किबोर्ड व दोन माऊस, असे 60 हजार रुपये किमतीचे साहित्य घरफोडी करून चोरून नेले. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गुंजाळ करीत आहेत.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group