लोंढे पितापुत्रांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल
लोंढे पितापुत्रांवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - रिक्षाचालकाच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर कब्जा करून ती परत देण्याकरिता व न्यायालयातील दावा मागे घेण्यासाठी 75 लाखांची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देऊन 20 हजारांची खंडणी उकळणार्‍या लोंढे पितापुत्रांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत रिक्षाचालक सुरेश संतू वाघ (रा. उत्कर्षनगर पोलीस अकादमी, त्र्यंबक रोड, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की महिरावणी, त्र्यंबकेश्‍वर येथील सर्व्हे नंबर 233 मधील दुसरा हिस्सा गट नंबर 448 मध्ये फिर्यादी वाघ यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. 

आरोपी बिल्डर ईश्‍वरभाई शिवगण मावाणी (रा. ओम्कार बंगला, विधातेनगर, हिरावाडी रोड, पंचवटी), प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढे, दीपक रतन मटाले (रा. कामटवाडा, नाशिक) व गणेश पंडित चव्हाण यांनी संगनमत करून बनावट दस्तऐवज तयार करून फिर्यादी यांची संमती न घेता त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर कब्जा केला. त्यानंतर एबीबी सर्कलजवळील हॉटेल राधिका येथे फिर्यादीस बोलावून घेतले. 

सर्व आरोपींनी संगनमत करून कब्जा केलेली जमीन परत देण्याकरिता व न्यायालयातील दिवाणी दावा मागे घेण्याकरिता फिर्यादीकडे 75 लाख रुपयांची मागणी करून त्याला जिवे मारण्याची भीती घातली. त्यानंतर फिर्यादीकडून 20 हजार रुपये घेऊनही जमीन परत मागितली, तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

हा प्रकार दि. 15 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत महात्मानगर येथील हॉटेल राधिका येथे घडला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group