नाशिक ( प्रतिनिधी ) :  एम आर एफ मोग्रीप एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस  स्पर्धा शनिवार १ नोव्हे.  रोजी नाशिक येथे संपन्न होत आहे . एम आर एफ मोग्रीप एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपरक्रॉस विजेतेपद स्पर्धेचे  २०२५ सालच्या स्पर्धेतील हि तिसरी फेरी आहे .
भारत सरकार व आंतरराष्ट्रीय ऑलीम्पिक संघटनेच्या मान्यताप्राप्त फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया  एफ एम एस सी आय या मोटरस्पोर्ट्स महासंघाच्या मार्गदर्शक तत्वांच्या अधीन राहून या स्पर्धेचे आयोजन केले जाते .सात वर्ष राष्ट्रीय विजेतेपदाचा मान मिळवलेल्या शाम कोठारी यांच्या अधिपत्याखालील गॉड्स्पीड रेसिंग या संस्थेकडे या स्पर्धेचे सर्व अधिकार असून मागील पंचवीस वर्षांपासून गॉडस्पीड रेसिंग या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करीत आहे .
नाशिक मधील स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची धुरा सुरज कुटे ,मोहन पवार , हर्षल कडभाने ,विक्रम राजपूत , अमित सूर्यवंशीं ,आनंद बनसोडे  व सहकारी यांनी सांभाळली असून ट्रॅक बनवण्याचे अत्यंत महत्वाचे व जिकरीचे कामही त्यांनी हाताळले आहे .
सुपरक्रॉस हा कृत्रिमरित्या बनवलेल्या मार्गावर मोटारसायकल साठी घेण्यात येणारा स्पर्धा प्रकार असून या मार्गावर वाकदार वळणे व छोटे मोठे उंचवटे बनवलेले असतात . उंचवट्यावरून उंचच उंच उड्या मारत जाणारे स्पर्धक हा मोठा आकर्षणाचा भाग असतो . दिवसोंदिवस  या स्पर्धेला प्रेक्षकांच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे . प्रायोजक व प्रसिद्धी माध्यमांकडून मिळत असलेल्या भरघोस सहकार्यामुळे सर्वच प्रकारच्या मोटरस्पोर्ट्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे .
आपले कसब आजमावण्यासाठी स्पर्धकही या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होत असतात . नाशिकमध्ये होत असलेल्या या फेरीसाठी भारतातून विविध आठ गटांमध्ये विभागून तब्बल १२५ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला आहे . उत्तम संयोजक अनेक राष्ट्रीय विजेते नाशिकमध्ये तयार झालेले असल्याने मोटारस्पोर्ट्स विश्वात नाशिकचे एक वेगळेच स्थान आहे . नाशिकमधील प्रेक्षकांना देखिल स्पर्धाप्रकारातील बारकावे माहित असल्याने मैदानावर एक वेगळेच उत्साहपूर्ण वातावरण असते .
या स्पर्धेसाठी एफएमएससीआय चे मुख्य प्रबंधक म्हणून रवी श्यामदासानी  हे काम बघणार आहेत तर मनीष चिटको व सत्यजित नायक हे अधिकारी विशेष निमंत्रित असणार आहेत .  वाहन तपासणीस म्हणून अंकित गज्जर तर तांत्रिक समिती प्रमुख म्हणून रवी वाघचौरे हे काम बघणार आहेत . शाम कोठारी यांच्या मार्गदर्शनानुसार सुरज कुटे  व त्यांच्या सहकारी गटाने बनवलेल्या या मार्गावर १५ जम्पस , १ टेबलटॉप , व १ कट टेबलटॉप असणार आहे . तुलनात्मक रित्या बराच वेगवान ट्रॅक बनविलेला असल्याने स्पर्धकांचे कसाब पणाला लागणार असून प्रेक्षकांना मात्र येथे नेत्रदीपक स्पर्धा बघायला मिळेल .   
एस एक्स १ या विदेशी बनावटीच्या मोटारसायकल साठीच्या गटात अटीतटीची लढत बघायला मिळणार असून टीव्हीएस रेसिंग टीम च्या स्पर्धकांचा सहभाग या गटातील रंगात वाढवणार आहे . या स्पर्धेसाठी एम आर एफ टायर लि. ,टी व्ही एस मोटार कंपनी , सिडवीन एनर्जी , मॉन्स्टर एनर्जी  आणि आइ ओ सी सर्वो हे प्रायोजक लाभलेले आहेत. 
या स्पर्धेचे आयोजन ठक्कर डोम , सिटी सेंटर मॉल जवळ , नाशिक  येथे होणार असून शुक्रवार ३१ ऑक्टो. २०२५ रोजी संध्याकाळी  वाहनांची व कागदपत्रांची तपासणी होणार आहे . शनिवारी १ नोव्हें . २०२५ रोजी  सकाळी सराव होणार असून दुपारी १ वाजता मुख्य स्पर्धेला प्रारंभ होणार आहे . तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या पर्वणीच लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक शाम कोठारी व सुरज कुटे यांनी केले आहे.