नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रात फेरफार करत बनावट प्रमाणपत्र तयार करुन पोलीस प्रशासन व नाशिक औष्णिक विद्युत केंद्राची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी भानुदास बहिरु ढोकणे (वय 43, रा. न्यू सामनगाव, एकलहरे रोड, नाशिकरोड) याने 3 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर 2025 दरम्यान पोलीस विभागाकडून प्राप्त झालेल्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रात फेरफार केले. 
त्याने प्रमाणपत्र क्रमांक, तारीख, मजकूर, वास्तव्याचा कालावधी व रिमार्कमध्ये फेरफार करुन बनावट प्रमाणपत्र तयार केले. तसेच प्रमाणपत्रावरील युवराज गणपत पत्की यांच्या डिजिटल सही ऐवज भारतसिंग कालसिंग पराडके यांची डिजिटल सही करुन बनावट चारित्र्य पडताळणी पत्र तयार करत ते खरे असल्याचे भासवले.
हे बनावट प्रमाणपत्र त्याने नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे येथे सादर करुन नाशिक औष्णिक विद्युत केंद्राची आणि पोलीस प्रशासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले.याप्रकरणी ढोकणेविरुद्ध पोलीस हवालदार विशाल साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे करीत आहे.