लासलगाव : लासलगाव जवळील पिंपळगाव नजीकच्या शास्त्रीनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन मंदिरांतील दानपेट्या फोडून रोकड आणि चांदीच्या मूर्ती लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चोरीच्या पघटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शास्त्रीनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि सर्वेश्वर मंदिर या दोन मंदिरांमधील दानपेट्या चोरट्यांनी मध्यरात्रीच्या दोन वाजेच्या सुमारास फोडल्या. दोन्ही मंदिरांमधून अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली आहे. याशिवाय, श्री स्वामी समर्थ मंदिराच्या कपाटातून चांदीच्या मूर्तींची चोरी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, सर्वेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी उचलून नेत मंदिराच्या बाजूला असलेल्या शिवनदीच्या पात्रात फेकून दिली आहे. संपूर्ण चोरीची घटना मंदिरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजमध्ये दोन अज्ञात चोरटे मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चोरी करताना स्पष्टपणे दिसत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, सतत वाढत्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने मंदिर व परिसरात रात्रगस्त वाढवावी तसेच चोरट्यांना तातडीने गजाआड करावे अशी मागणी केली आहे.