नाशिक : खासगी सावकार विशाल कदमसह त्याच्या साथीदारांनी घेतली १० लाखांची खंडणी
नाशिक : खासगी सावकार विशाल कदमसह त्याच्या साथीदारांनी घेतली १० लाखांची खंडणी
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- व्याजाने दिलेल्या रकमेचे व्याज जबरदस्तीने वसूल करून त्याची मालमत्ता हडप करून दहा लाख रुपयांची खंडणी वसूल करणारा खासगी सावकार विशाल कदमसह त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संजय धोंडू पाटील (रा. नानाजी निवास, मोतीवाला कॉलेजसमोर, गंगापूर रोड) यांचा भाऊ अरुण धोंडू पाटील याने आर्थिक अडचणीच्या कारणास्तव सन 2025 मध्ये खासगी सावकार विलास सुभाष कदम (रा. स्वामीदर्शन बंगला, गुलमोहरनगर, म्हसरूळ) याच्याकडून 25 लाख रुपये व्याजाने घेतले होते. 




या पैशांपोटी दरमहा व्याज जमा केले व घेतलेली रक्कम परत दिली; परंतु आरोपी कदम याने या रकमेवर केवळ चार महिन्यांचे व्याज म्हणून दहा लाख रुपये अशी मोठी रक्कम जबरदस्तीने वसूल केली आहे. त्यामुळे फिर्यादीचे कधीही भरून न निघणारे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशाल कदम यास रक्कम परत केल्यानंतरही त्याने फिर्यादीचे, तसेच फिर्यादीचे भाऊ व आईच्या नावावर असलेल्या मालमत्ता फिर्यादी व त्याच्या भावास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी विशाल कदम याने स्वत:च्या व त्याच्या साथीदारांच्या नावावर लिहून व नोंदवून घेतल्या आहेत. 

त्यापैकी एक फ्लॅट इतर लोकांना चढ्या दराने विक्री करून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेतला आहे. व्याजाने घेतलेली मूळ रक्कम व त्यावरील व्याज आरोपीला परत दिल्यानंतर फिर्यादीची मालमत्ता परत करीन, असे खोटे आश्‍वासन दिले. फिर्यादीच्या मालमत्ता कदम याने स्वत:च्या व इतर साथीदारांच्या नावांवर फिर्यादीच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन लिहून घेऊन खंडणीस्वरूपात फिर्यादीची मालमत्ता हडप केली. 

ही मालमत्ता परत मिळण्याबाबत फिर्यादीने त्या आरोपीला वारंवार विनवण्या केल्या असता आरोपीने स्वत: व शरद केदार, तसेच त्याच्या गुंड साथीदारांमार्फत फिर्यादीच्या कुटुंबातील सदस्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली, तसेच फिर्यादीच्या घरात अनधिकृतपणे घुसून दहशत निर्माण केली. हा प्रकार दि. 5 ऑगस्ट 2014 ते दि. 28 ऑक्टोबर 2025 या कालावधीत घडला. 

या प्रकरणी आरोपी खासगी सावकार विशाल सुभाष कदम, शरद सोनू केदार (रा. धात्रक फाटा, आडगाव शिवार) व त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध खंडणीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महाजन करीत आहेत.
Nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group