नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- व्याजाने घेतलेल्या पैशाच्या मोबदल्यात व्याजाची रक्कम वसूल करूनही पुन्हा पावणेतीन लाख रुपयांची खंडणी मागून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खासगी सावकारासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हेमंत कृष्णा कापसे (रा. चिनार सोसायटी, शिवाजीनगर, जेलरोड) हे नोकरदार असून, त्यांना पैशांची गरज होती. त्यांनी आरोपी खासगी सावकार कैलास मैंद याच्या जेलरोड येथील हरिविहार सोसायटीतील कार्यालयात जाऊन त्यांनी मैंदकडून अडीच लाख रुपये व्याजाने घेतले.
या पैशांच्या बदल्यात खासगी सावकार मैंद याने फिर्यादी 2 लाख 75 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली, तसेच ही रक्कम न दिल्यास फिर्यादीसह त्यांच्या परिवारास संपवून टाकण्याची धमकी दिली, तसेच फिर्यादीकडून सप्टेंबर 2022 मध्ये 50 हजार रुपये बळजबरीने घेतले, तसेच आरोपी मैंद याचे हस्तक आरोपी संतोष कुशारे व फरान सय्यद यांनी फिर्यादीला फोन करून परिवारासह संपवून टाकण्याची धमकी देऊन 2 लाख 75 हजार रुपयांची खंडणी मागितली.
हा प्रकार दि. 30 जून 2022 ते 3 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जेलरोड येथील मैंद यांच्या कार्यालयात घडला.