नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहर परिसरात दोन घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका ठिकाणी मंगल कार्यालयातून, तर दुसर्या ठिकाणी घरफोडी करून सुमारे 18 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने व रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घरफोडीचा पहिला प्रकार तपोवनात घडला. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी सुषमा शेषराज निर्वाण (रा. मुंगसाजीनगर, दिघोरी, ता. जि. नागपूर) यांच्या मुलाचा काल (दि. 6) दुपारी तपोवनातील स्वामीनारायण हॉल येथे साखरपुड्याचा कार्यक्रम होता. यावेळी फिर्यादी सुषमा निर्वाण यांच्याजवळ असलेल्या पर्समध्ये 2 लाख 25 हजार रुपये किमतीचे 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 2 लाख रुपये किमतीचा 40 ग्रॅम वजनाचा सोन्याचा चपलाहार, 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले असलेले मंगळसूत्र, 70 हजार रुपये किमतीचे 15 ग्रॅम वजनाचे कानातील झुमके, 3 हजार रुपये किमतीची 1 ग्रॅम वजनाची आर्टिफिशियल पोत, 25 हजार रुपयांची रोख रक्कम व 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल ठेवलेला होता. अज्ञात चोरट्याने फिर्यादी महिलेची नजर चुकवून हॉलमध्ये असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन या पर्समधील 6 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.
घरफोडीचा दुसरा प्रकार सातपूर येथे घडला. फिर्यादी निशाद रज्जाक शेख (रा. एमएचबी कॉलनी, सातपूर, नाशिक) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर आतील रूममध्ये जाऊन लोखंडी कपाटाचा दरवाजा व त्यातील लॉकर कशाच्या तरी सहाय्याने तोडले.
लॉपरमध्ये असलेली 1 लाख 40 हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चेन, 70 हजार रुपयांच्या 1 तोळा वजनाच्या अंगठ्या, 42 हजार रुपये किमतीचे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, 28 हजार रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे कानातील वेल, 24 हजार 500 रुपये किमतीचे साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स, 87 हजार 500 रुपये किमतीचा साडेबारा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 7 हजार रुपये किमतीची एक ग्रॅम वजनाची कानातील बाळी, 7 हजार रुपये किमतीची 1 ग्रॅम वजनाची नाकातील नथ, 35 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 4 हजार रुपये किमतीचे 10 भार चांदीचे पैंजण, 40 हजार रुपयांची रोख रक्कम व दोन पासपोर्ट असा 4 लाख 84 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.