नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- प्रेमसंबंधातून प्रेयसीने बालिकेला जन्म दिल्यानंतर लग्नास नकार देणार्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी तरुणीही पाथर्डी फाटा परिसरात राहते. आरोपी मयूर युवराज कछवे (रा. जत्रा हॉटेलजवळ, आडगाव शिवार, नाशिक) व तिची इन्टाग्रामवर ओळख झाली होती.
पिडीता ही यापूर्वी विवाहित होती. मात्र पतीशी पटत नसल्याने ती विभक्त राहत होती. दरम्यान तिची ओळख मयूर कछवेसोबत सोशल मिडियाद्वारे झाली. नंतर त्याने दोघांमध्ये प्रेम निर्माण होऊन ते लिव्हईन राहू लागले. त्याने फिर्यादी तरुणीस लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
त्यातून ही पीडिता गर्भवती झाली व काही दिवसांनी तिने मुलीला जन्म दिला. त्यानंतर पीडितेने आरोपी मयूर याच्याकडे लग्नाची मागणी केली असता त्याने पीडितेस शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून लग्न न करता तिची फसवणूक केली. हा प्रकार सन 2023 पासून दि. 3 नोव्हेंबर 2025 या कालावधीत घडला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.