नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : “तू माझ्यासोबत संंबंध ठेवले नाहीत, तर तुझ्या घरातील कोणाचा तरी बळी जाईल,” अशी धमकी देऊन महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरीने लैंगिक अत्याचार करून तिच्या कुटुंबीयांची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही इंदिरानगर परिसरात राहते. आरोपी गणेश जयराम जगताप (रा. कामाख्या मंदिर, धारणगाव खडक, ता. निफाड) याने भोंदूगिरी व बाबागिरी करण्यासाठी त्याला एका महिलेची आवश्यकता असल्याचे फिर्यादीला सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला दारूचे व्यसन लावून ते व्यसन सोडविण्याच्या बहाण्याने भोंदूबाबा गणेश जगताप याने फिर्यादीशी जवळीक साधून “तू मला खूप आवडतेस.
तुला मिळविण्यासाठी मी स्मशानात पूजा करीत आहे,” असे सांगितले, तसेच पीडितेला एक पुस्तक काढून दाखविले. त्या पुस्तकात फिर्यादी, तिचे पती आणि मुलांची नावे लिहिलेली होती. हे पुस्तक दाखवून भोंदूबाबाने “तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत, तर पुस्तकात लिहिलेल्या नावातील कोणाचा तरी बळी जाईल,” अशी धमकी देऊन पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने अनेकदा लैंगिक अत्याचार केले, तसेच फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांची 50 लाख रुपयांची फसवणूक केली.
हा प्रकार सन 2010 ते 2025 या कालावधीत पाथर्डी गावातील गौळाणे रोड येथे घडला. या प्रकरणी गणेश जगताप या भोंदूबाबा-विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त बारी करीत आहेत.