पिंपळगाव खांब येथील शेतजमीन बळकावण्याच्या उद्देशाने शेतकऱ्याला मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या गुन्ह्यात माजी सभापती शिवाजी आप्पा चुंबळे यांना जिल्हा न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. नाशिकरोड येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश केदार जोशी यांनी चुंबळे यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
आरोपीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अविनाश भिडे, ॲड. सूरज मंत्री, ॲड. मृणाल भिडे आणि ॲड. सूरज चव्हाण यांनी कामकाज पाहिले याबाबतचे अधिक वृत्त असे की, वडनेर पाथर्डी रोडवरील पिंपळगाव खांब येथील रहिवासी सुरेश कंजा बोराडे (५५) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बोराडे यांची सर्वे नंबर ३०/१ मध्ये ४५ गुंठे शेती आहे.
फिर्यादीनुसार, दि. १४ एप्रिल रोजी बोराडे शेतात फ्लॉवरच्या पिकाला पाणी देत असताना शिवाजी चुंबळे ६ ते ७ साथीदारांसह तिथे आले. "या शेतावर मला कब्जा करायचा आहे, तू पुन्हा इथे दिसला तर तुला जिवे मारून टाकेन," अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले होते. यावेळी झालेल्या झटापटीत एका संशयिताने धारदार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र हात आडवा केल्याने बोराडे थोडक्यात वाचले.
दहशतीनंतर पोलिसांत धाव या घटनेनंतर संशयितांनी बोराडे यांचा पुतण्या योगेश यालाही जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास चुंबळे आणि त्यांच्या साथीदारांनी बोराडे यांच्या शेतात ट्रॅक्टर घालून उभ्या फ्लॉवरच्या पिकावर नांगर फिरवला. या सततच्या त्रासामुळे आणि दहशतीमुळे अखेर बोराडे कुटुंबाने उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.
सदर प्रकरणात अटक टाळण्यासाठी शिवाजी आप्पा चुंबळे यांनी नाशिकरोड न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी संशयित आरोपीच्या वतीने वकिलांनी मांडलेली बाजू आणि पुराव्यांची दखल घेत न्यायाधीश केदार जोशी यांनी चुंबळे यांना अंतरिम जामीन मंजूर केला.