बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली
बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (सुधीर कुलकर्णी) :- शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी आज सकाळी आपल्या शिवसेना ठाकरे गट उपनेतेपदाचा राजीनामा दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

बबनराव घोलप यांनी कालच चर्मकार समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विविध मागण्या सादर केल्या. त्यापैकी 90 टक्के मागण्या मान्य झाल्याचे बबन घोलप यांनी सांगितले. घोलप व मुख्यमंत्र्यांंच्या भेटीमुळे वेगळी चर्चा सुरू होती अखेर आज बबनराव घोलप यांनी सकाळी निर्णय घेऊन शिवसेना सदस्यत्व पदाचा व उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे.

बबनराव घोलप यांच्याकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रीपद होते. ते काढून घेतल्यापासून घोलप शिवसेना ठाकरे गटावर नाराज होते. हे राजकीय वातावरण बघून त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला होता मात्र तो स्वीकारण्यात आलेला नव्हता.

त्यानंतरही संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या व्यथा कथन केल्या होत्या, मात्र प्रत्यक्ष बोलणे झाल्यानंतरही कोणतीही हालचाल न झाल्याने चर्मकार संघ एकवटून मुंबईत निदर्शने देखील करण्यात आली होती. या सर्व प्रक्रियेत ठाकरे गटाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे व्यथीत झालेल्या बबन घोलप यांनी आज अखेर राजीनामा देण्याचे शस्त्र उगारले असून एक-दोन दिवसांत ते त्यांचा पुढील निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे बबनराव घोलप हे लवकरच शिंदे गटात सामील होणार हे नक्की झाले असून त्यावर एक-दोन दिवसांतच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 


शिवसैनिक पदाचा राजीनामा
मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणुन मी निष्ठेने व ईमानेईतबारीत काम केले आहे. मला पक्षाने जे जे सांगितले, ते प्रामाणिकपणे केले. पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुखपदावरुन काढुन मला अपमानित करण्यात आले, व मी ज्यांना निष्क्रीय पदाधिकारी म्हणून काढुन टाकले होते व नविन पदाधिकारी नेमले होते त्यांनाही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक अमर कतारीला कुठेच ठेवले नाही. ज्या सहा विधानसभा संर्पकप्रमुखांनी लेखी कळवले होते, की हे जुने पदाधिकारी कसे बिनकामाचे, विकाऊ आहेत. ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पदे दिली. हे सर्व पाहुन मी अचंबित आहे.  नेमके माझे काय चुकले, ते समजले नाही. मी याबाबत दादही मागितली पण काहीच उत्तर मिळाले नाही आणि माझी वकीली करणारेही गप्प आहेत. त्यामुळे आपण थाबुंन घेणे महत्वाचे वाटते. म्हणुन मी माझा शिवसैनिक पदाचा राजीनामा देत आहे.                   
                         
आपला  ,    
बबन घोलप


इतर बातम्या
Join Whatsapp Group