नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. लोकसभेची प्रत्येक जागा भाजपसाठी महत्त्वाची असल्याने पक्षाकडून त्यादृष्टीने सूक्ष्म व्यवस्थापन करण्यात आले आहे. अशातच भाजपशी जवळीक असलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक दावा केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन नेते भाजपविरोधी आघाडीचा प्रमुख चेहरा आहेत. परंतु, रवी राणा यांनी थेट उद्धव ठाकरे हेच भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. उद्धव ठाकरे हे सध्या सातत्याने पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते सोमवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले रवी राणा?
उद्धव ठाकरे हे सध्या प्रचंड बैचेन आहेत. त्यांना कधी मोदीजींचं दर्शन घेतो आणि माफी मागतो, असे झाले आहे. मी मोदीजींसमोर कधी आत्मसमर्पण करतो, असे त्यांना झाले आहे. उद्धव ठाकरे हे सध्या काही लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्त्व स्वीकारुन पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. ते लवकरच काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ सोडतील, असा दावा रवी राणा यांनी केला.
दरम्यान एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन एनडीए आघाडीत आले. अजित पवारही मोदींसोबत आले. उद्धव ठाकरे यांना अहंकारामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला होता. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मातोश्रीवर सध्या चिंतन सुरु आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.