पतीकडून पत्नीचा खून; अपघाताचा केला बनाव
पतीकडून पत्नीचा खून; अपघाताचा केला बनाव
img
दैनिक भ्रमर

नाशिक : निफाड तालुक्यातील तामसवाडी येथे अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली असून, संशयिताने मेव्हुण्यावरही कोयत्याने वार केल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित पतीला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, गंभीर जखमी पत्नी व मेव्हुण्याला संशयितच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन आला. जखमी मेव्हुण्याच्या फिर्यादीनुसार पती-पत्नीच्या वादातून खून झाल्याचे म्हटले आहे.

मनोज रमेश पोतदार (वय ३३, रा. तामसवाडी, ता. निफाड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. वर्षा मनोज पोतदार (वय २९) असे मयत पत्नीचे नाव असून, लाला बाळू शेवरे (वय ३० रा. तामसवाडी) हा गंभीर जखमी आहे.

लाला शेवरेने सांगितले की, संशयित मनोज यास दारुचे व्यसन आहे. त्यावरून त्याची व पत्नी वर्षा यांच्यात सातत्याने भांडण होत असे. बुधवारी (ता. १३) दुपारीही त्यांच्या वाद झाले असता, त्यावेळी संतापामध्ये संशयित मनोज याने कोयत्याने पत्नी वर्षावर वार केले.

यात ती गंभीररित्या जखमी झाली. त्यावेळी बचावासाठी गेलेल्या मेव्हुणा शेवरे याच्यावरही मनोजने कोयत्याने वार केले. त्यानंतर संशयितानेच दोघा जखमींना चांदोरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, त्यांच्या प्राथमिक उपचार करून नाशिक जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणी उपचारादरम्यान मध्यरात्री वर्षाचा  मृत्यु झाला.

याप्रकरणी संशयित मनोज याच्याविरोधात खुनासह प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मनोजवर संशय आल्याने त्यांनी त्याची उलट तपासणी केली, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group