नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- ऑनलाईन परीक्षेत स्वत:च्या जागी डमी विद्यार्थी बसवून परीक्षेत गैरप्रकार करून महानिर्मितीची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत योगेश देवमन सावकार (वय 43, रा. रत्ना हाईट्स, इंदिरानगर, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की महानिर्मिती कंपनीने कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) या पदाची ऑनलाईन परीक्षा दिंडोर रोडवर पुणे विद्यार्थी गृहाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे घेण्यात आली.
यावेळी आरोपी रणजित रतनसिंग जारवाल व सौरभ हिरालाल जारवाल (दोघेही रा. बोंबल्याची वाडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज भरतानाचे छायाचित्र व ऑनलाईन परीक्षेच्या वेळेचे छायाचित्र यामध्ये तफावत दिसून आली. तसा रिपोर्ट ऑनलाईन परीक्षा घेणार्या मे. आय. बी. पी. एस. या संस्थेने दिला.
यातील आरोपींनी महानिर्मिती कंपनीने घेतलेल्या कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा) या पदाच्या ऑनलाईन परीक्षेत स्वत:च्या जागी डमी इसम बसविला, तसेच आरोपी सौरभ जारवाल याने त्याच्याकडे असलेल्या स्पाय कॅमेर्याद्वारे परीक्षेतील पेपरमधील प्रश्न बाहेर पाठविले व ब्ल्यूटूथद्वारे प्रश्नाचे उत्तर मागवून तो पेपर सोडवीत असल्याचे निदर्शनास आले.
यातील आरोपीने परीक्षा प्रक्रियेदरम्यान गैरप्रकार करून महानिर्मिती कंपनीस फसविण्याच्या उद्देशाने डमी विद्यार्थी बसविल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 मार्च रोजी घडला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.