पालकांनो तुमचीही मुलं  मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळताय तर मग सावधान!  नेमकं काय घडलं? वाचा
पालकांनो तुमचीही मुलं मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळताय तर मग सावधान! नेमकं काय घडलं? वाचा
img
Dipali Ghadwaje
वसई : सायबर भामट्याने केलेल्या आर्थिक फसवणुकीमुळे नालासोपारा येथील एका १८ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आईच्या मोबाईल मध्ये खेळत असताना चुकून एक लिंक ओपन झाली आणि सायबर भामट्याने २ लाख रुपये लंपास केले होते. यामुळे वडील रागावतील या भीतीपोटी त्याने आत्महत्या केली.

नालासोपारा पूर्वेच्या धानिवबाग येथील ओम जीडीएस कॉलनीत अविनाश रॉय (४०) हे पत्नी आणि गौरव (१८) भोला (१५) या दोन मुलांसह राहतात. मोठा मुलगा गौरव हा नालासोपारा मधील कुमारी विद्यामंदीर शालेत ११ वी इयत्तेत शिकत होता. सुट्टी लागल्याने त्याने आईचा मोबाईल गेम खेळण्यासाठी घेतला होता. 

यावेळी बुधवारी त्याच्या मोबाईलवर एक लिंक आली. चुकून त्याने ती लिंक ओपन केली. मात्र ती फसवी लिंक सायबर भामट्यांनी पाठवली होती. लिंक ओपन केल्यामुळे सायबर भामट्यांनी गौरवचा मोबाईल हॅक केला. हा मोबाईल त्याच्या वडिलांच्या बॅंक खात्याशी लिंक होता. सायबर भामटयांनी मोबाईल हॅक करून त्यात असलेल्या वडिलांच्या बॅंक खात्यातील २ लाख रुपये लंपास केले.

या प्रकारामुळे गौरव खूप घाबरला. त्याच्याकडून नकळत चुक घडली होती. वडिलांना ही गोष्ट समजल्यावर ते रागावतील, मारतील ही भीती त्याला वाटली. काय करू त्याला समजत नव्हते. त्यामुळे दुपारी ३च्या सुमारास त्याने किटकनाषक प्राशन केले. काही वेळाने त्याच्या छातीत दुखू लागले

शेजार्‍यांनी गौरवला उपचारासाठी वसईच्या एव्हरशाईन येथील आयकॉनीक मल्टिस्पेशालिटी या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी आचोळे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या संदर्भात गौरवचे वडील अविनाश रॉय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी काहीही सांगण्याची मनस्थिती नसल्याचे सांगितले. सायबर भामट्याने मोबाईलवर लिंक पाठवून तो हॅक केला आणि त्याच्या वडिलांच्या खात्यातील २ लाख लंपास केले अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा पेल्हार पोलिसांच्या हद्दीत घडल्याने तो पुढील तपासासाठी पेल्हार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी योगेश मदने यांनी दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group