बस पुलावरून कोसळली ; दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, ४० जण गंभीर जखमी
बस पुलावरून कोसळली ; दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू, ४० जण गंभीर जखमी
img
दैनिक भ्रमर
मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ओडिशातील जाजपूर येथे भीषण अपघात घडला आहे. येथील उड्डाणपुलावरून जात असलेली प्रवासी बस खाली पडल्याने पाच जण ठार आणि अनेक जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडली तेव्हा बस पुरीहून पश्चिम बंगालच्या दिशेने जात होती. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघात घडला त्यावेळी बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह सुमारे 50 लोक प्रवास करत होते. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार, बस पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया येथे सर्व प्रवाशांना घेऊन जात होती.


यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रसूलपूर परिसरातील बाराबती चौकाजवळील ओव्हर ब्रिजवरून खाली पडली. जाजपूरचे जिल्हाधिकारी आणि एसपी यांच्या नेतृत्वाखाली अपघातस्थळी बचाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी क्रेनच्या साहाय्याने पुलाखालील बस बाहेर काढण्यात आली. गंभीर जखमींना प्रथम जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत जाहीर केली. पटनायक यांनी जिल्हा प्रशासनाला जखमींवर उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group