काँग्रेस पक्षाच्या पुरी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणुक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभेत यश मिळवण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज मैदानात उतरले असतानाच आता तिसऱ्या उमेदवारानेही माघार घेतल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.
पक्षाकडून निवडणुक लढवण्यासाठी निधी मिळत नसल्याची तक्रार करत सुचारिता मोहंती यांनी तिकीट पक्षाकडे परत केले आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
सुरत, इंदूरनंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ओडिशातील पुरीमध्ये काँग्रेस उमेदवार सुचरिता मोहंती यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पक्षाकडून कोणतीही आर्थिक मदत केली जात नसल्याचा आरोप मोहंती यांनी केला आहे.
पक्षाच्या निधीशिवाय निवडणूक प्रचार करणे मला शक्य नाही, त्यामुळे मी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. मी तिकीट परत करत आहे, असे मोहंती यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना लिहिलेल्या पत्रात सुचरिता यांनी पक्षाने मला निधी देण्यास नकार दिल्याने पुरी लोकसभा मतदारसंघातील आमच्या प्रचारावर परिणाम झाला आहे. मी याबद्दल ओडिशा काँग्रेसचे प्रभारी डॉ. अजॉय कुमार जी यांना सांगितले तेव्हा त्यांनी तुम्हीच व्यवस्था करा, असे म्हटल्याची तक्रारही केली आहे.