उकाड्यानं हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा! नाशिक शहरात पावसाची हजेरी
उकाड्यानं हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा! नाशिक शहरात पावसाची हजेरी
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :  असह्य ऊन आणि उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नाशिककरांना गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळाला.

यंदा गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कडक उन्हाळा जाणवत होता. जून महिना आला तरी तळपते ऊन व त्यामुळे वातावरणात उष्णता वाढत होती. अक्षरशः एसी, फॅन, कुलर हे देखील उन्हाच्या तीव्रतेने गारवा देत नव्हते. त्यामुळे नागरिक आकाशाकडे नजरा लावून पावसाची वाट पाहत होते. त्यातच गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वातावरणात बदल होऊ लागला आणि ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटात पावसालासुरुवात झाली. सुमारे तास-दीड तास नाशिकरोड भागात पाऊस सुरू होता. त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.

पावसाने हजेरी लावताचा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले. काही तरुण-तरुणी, बाळगोपाळांनी पहिल्या पावसात भिजून आनंद व्यक्त केला; मात्र कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना पावसात भिजतच जावे लागले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group