23 जून रोजी हरियाणातील यमुना नगर येथे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका घरात दोघांचे मृतदेह आढळले होते. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरातील 45 वर्षीय मीना सैनी आणि त्यांचा 23 वर्षांचा मुलगा राहुल यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी घरात तपास केला असता कपाटदेखील उघडे दिसले आणि त्यातील दागिने गायब होते. घरातील दोघांची हत्या आणि त्यानंतर लूट यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी इतर शेजाऱ्यांची चौकशी सुरू केली असता त्याचवेळी घरात एक मुलगी दाखल झाली. पोलिसांनी तिची चौकशी केली असता ती या कुटुंबातील सदस्य असून त्यांची एकुलती एक मुलगी आहे. चौकशीत तिने म्हटलं की, ती ज्यूस आणण्यासाठी बाहेर गेली होती.
पोलिसांनी मृतदेहाचा शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर या प्रकरणात चौकशी सुरू केली. तेव्हाच पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरा दिसला. मात्र, सीसीटीव्ही सकाळपासून बंद होते. याबाबत काजलला विचारलं असता तिने उलट सुलट उत्तरं देण्यास सुरुवात केली.
काजलचे वागणे पाहूनही पोलिसांना संशय आला. तिच्या चेहऱ्यावर थोडेदेखील दुखः नव्हते. 24 तासांच्या आतच तिने तिचा कबुलीजबाब कित्येकवेळा बदलला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. तेव्हा तिने सांगितलेली गोष्ट ऐकून पोलिसही हादरले. काजलनेच तिच्या जन्मदात्या आईची आणि भावाची हत्या केली आहे. या हत्याकांडात तिच्या मामाच्या मुलाने तिची साथ दिली होती.
काजलला मुलांसारखं राहण्याची हौस होती. मात्र तिच्या आईने व भावाने याचा विरोध केला. याचाच राग तिच्या मनात होता. त्याचवेळी तिच्या मामाच्या मुलाचेदेखील तिच्या आईसोबत वाद झाले होते. त्यामुळं काजलच्या मनात त्यांच्याबद्दल वाढणारी चिड पाहून त्यानेही तिला आणखीन भडकावले. त्यानंतर दोघांनीही हे हत्याकांड रचले.
काजलच्या आईला व भावाचा जीव घेतला तर त्यानंतर काजल तिचं आयुष्य मनासारखं जगू शकते. तसंच, कृषला देखील संपत्ती मिळेल. दोघांनी 23 जून रोजी सकाळी पहिले काजलच्या आईचा गळा आवळून हत्या केली. तर, त्यानंतर राहुलच्या डोक्यावर वार करुन त्याच्या गळा घोटून जीव घेतला.दोघांच्याही हत्येनंतर काजल आणि कृष यांनी घरातील दागिने चोरले व घराबाहेर पडले. त्यानंतर ते स्कुटीवर फिरत होते. पोलिस घरी आल्यानंतर ते घरी जातील असा त्यांचा कट होता.