२९ जून २०२४
नाशिक :- कोटक महिंद्रा बँकेच्या इंदिरानगर शाखेत एका हॉस्पिटलच्या मेडीक्लेमकरिता पाचशे रुपये दराच्या 13 बनावट नोटांचा भरणा अज्ञात इसमाने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी स्वप्नील सुनील नगरकर (रा. अयोध्यानगर, अमृतधाम, पंचवटी) हे कोटक महिंद्रा बँकेच्या इंदिरानगर शाखेचे ब्रँच ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम पाहतात. नगरकर हे दि. 3 जून रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा दरम्यान कार्यालयात होते. त्यावेळी बँकेच्या कॅशिअर अंकिता गायकवाड या नगरकर यांच्याकडे आल्या. त्यांनी त्यांना सांगितले, की बँकेच्या 6247472433 या क्रमांकाच्या खातेदार ग्राहक सुबोध सुधीर रत्नपारखे (रा. सुश्री अपार्टमेंट, वडाळा, नाशिक) हे सकाळी 11 वाजेच्या सुमारास पैशांचा भरणा करण्यासाठी आले होते.
त्यावेळी त्यांना व फिर्यादी यांना असे समजून आले, की अकोले हॉस्पिटल, अहमदनगर येथे कोणी तरी अज्ञात इसमाने पाचशे रुपये दराच्या भारतीय चलनाच्या तेरा बनावट नोटा मेडिक्लेमसाठी दिल्या आहेत. यामध्ये वेगवेगळ्या क्रमांकांच्या पाचशे रुपये दराच्या भारतीय चलनाच्या बनावट नोटांवर बँकेचा लाल शिक्का मारलेला व या नोटांच्या पुढील व मागील बाजूस कॅशिअर अंकिता गायकवाड यांनी सही केलेली आहे. त्यामुळे या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत नगरकर यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.
Copyright ©2024 Bhramar