लूटमारीच्या,चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोरअसु देत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशातच एका चिमुकल्याने 30 सेकंदात 33 हजार गायब केले आहे.
हातचलाखीने सर्वांची नजर चुकवत 33 हजाराची रोकड घेऊन पसार झाला आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बँकेत घडलेल्या प्रकाराने पोलिसही अचंबित झाले आहेत. ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धक्कादायक म्हणजे हा चोर कोणी मोठा व्यक्ती नसून चिमुकला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या एका मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये एका चिमुकल्या चोरट्याने ग्राहकाची तब्बल 33 हजाराची रोकड लांबविल्याची घटना घडली. चोरी करताना हा चिमुकला सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय.
हातामध्ये लाल पिशवी घेऊन हा चिमुकला बँकेत आला होता आणि त्याचवेळी त्याने गर्दीचा फायदा घेऊन ग्राहकाची ही रोकड लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर शहर पोलीस बँकेत दाखल झाले. मात्र, तोपर्यंत हा चिमुकला तेथून पसार झाला. त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे आता या मुलाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. लहान मुलांच्या हातून चोरी घडवून आणणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध घेणे हे देखील आता पोलिसांसमोर आव्हान असणार आहे