नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- नातीच्या मृत्यु नंतर दहा दिवसांनी जखमी आजोबांचाही आज दुर्दैवी मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिटीलिंक बसच्या मद्यधुंद चालकाने शाळेतून घरी निघालेल्या नात व आजोबांना चिरडले होते. त्यात आजोबा हे जखमी झाले होते.
दि 10 जुलै रोजी देवळालीगाव मालधक्का येथील रहिवाशी समाधान गणपत गवई (वय 70) हे आपल्या पाच वर्षाची नात सान्वी सागर गवई हिस शाळेतून घरी घेऊन येत होते. नाशिकरोडच्या पूर्व भागातील सिटी लिंक बस डेपो मधून पायी येत असतांना MH 15 BG 7719 वरील मद्यधुंद बसचालकाने सान्वी व तिच्या आजोबांना चिरडले, त्यात सान्वीचा जागीच मृत्यू झाला तर आजोबा समाधान गवई हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या उपचार सुरु असतांना आज त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी नाशिकरोड पोलिसात बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नातीच्या मृत्यु नंतर दहा दिवसांनी झालेल्या आजोबांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.