नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- व्ही एन नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज (दि.२८) सकाळी आठ वाजता सुरू होणार होती मात्र प्रत्यक्षात अकरा वाजेपर्यंत सर्व मतमोजणी अधिकारी केवळ स्टेशनरी न मिळाल्याने बसून होते.
या दरम्यान काल मतमोजणी प्रसंगी झालेल्या किरकोळ प्रकारामुळे काही उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बाचाबाची केल्याने या अधिकाऱ्यांनी मतमोजणी न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
त्यामुळे आज मतमोजणीच्या वेळी विलंब झाला. अखेर चर्चेतून तोडगा निघाल्याने अकराच्या सुमारास सर्व मतमोजणी अधिकाऱ्यांना स्टेशनरी स्टेशनरी पुरवण्यास सुरुवात झाली.
आता प्रथम मतपत्रिकांच्या पेट्या फोडून त्यातील मतपत्रिकांचे वर्गीकरण केले जाणार आहे. वर्गवारीनंतर २५-२५ प्रमाणे मतपत्रिकांचे गठ्ठे करून ते मतमोजणी अधिकाऱ्यांना दिले जाणार आहेत. मात्र या मतमोजणी प्रक्रियेला देखील बराच वेळ लागणार असून किमान एक तासानंतर नंतर ही प्रक्रिया सुरू होईल असा अंदाज आहे.
मखमलाबाद रोडवरील भावबंधन मंगल कार्यालयात सुरू असलेल्या या मतमोजणीच्या प्रक्रियेत पहिली मतमोजणी ही विश्वस्तपदासाठीची होणार असून त्यानंतर महिला राखीव गटाची मतमोजणी केली जाणार आहे. या दृष्टीने मतपेटी आणि काम सुरू झाले असून वर्गवारी नंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल असे चित्र दिसत आहे.
पासेस असून देखील पत्रकारांना केंद्रात जाण्यास मज्जाव
या मतमोजणी करता पत्रकारांना पासेस देऊन देखील आत मध्ये जाण्यास मतदान करण्यात आला आठ वाजता सुरू होणारी मतमोजणी प्रत्यक्षात उशिरा सुरू झाली असली तरीही सुमारे साडेदहा वाजेपर्यंत पत्रकारांना बाहेरच ताटकळत उभे केले होते. अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची संपर्क साधून पोलिसांनी रोखलेल्या पत्रकारांना आत सोडण्यात आले.