नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- भाजीपाला घेण्यासाठी जात असताना महिलेच्या गळ्यातील चेन चोरणार्या चोरट्यांना इंदिरानगर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की इंदिरानगर परिसरातील एक महिला भाजी घेण्यासाठी काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रथचक्र चौक येथून पायी जात होत्या. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ त्या आल्या असता एका दुचाकीवरून आलेल्या दोघा इसमांनी त्यांच्या मागून येत कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाची 1 लाख 10 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून नेली.
त्यावेळी त्या महिलेने चोरट्यांना प्रतिकार केला असता त्यांची दुचाकी स्लीप झाल्याने ते खाली पडले. नंतर ते पळून जात होते. त्या वेळेस इंदिरानगरचे डीबी पथक गस्त घालत होते. त्यांनी याबाबत त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अंकोलीकर यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी त्वरित दोन पथके चोरट्यांचा शोध घेण्यासाठी रवाना केली. चोरटे हे राणेनगरच्या परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याचे समजल्याने पोलिसांनी तेथे सापळा रचला होता. चोरटे तेथे येताच त्यांनी त्यांचा पाठलाग करीत त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी घटना घडल्यावर त्वरित तपासाची सूत्रे फिरविल्याने नागरिकांकडून इंदिरानगर पोलिसांचे कौतुक होत आहे.
त्या दोघांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत. त्या महिलेच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.