नाशिक :- वाद मिटवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यासह 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर 10 ते 15 जणांच्या टोळक्याने हत्याराने वार करून त्यांना जखमी केल्याची घटना माऊली लॉन्स जवळ घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, माऊली लॉन्स जवळ केवल पार्क येथे रस्त्यावर काही लोक वाद घालत असल्याचे पोलिसांना फोन द्वारे समजले. त्यामुळे अंबड पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. तेथे गेल्यावर त्यांना समजले की, मनपाचे कर्मचारी कोर्टाच्या आदेशाने कंपलिशनचे इंस्पेक्शन करण्यासाठी केवल पार्क येथे आले होते. तेव्हा त्यांच्यात जागेवरून रस्त्यावर वाद सुरू होता.
पोलीस वाद मिटवायला गेले असता त्या टोळक्याने मनपाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली तसेच पोलिसांना पण धक्काबुक्की केली. संशयित गणेश गाडे याने अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांची कॉलर पकडून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांना जखमा झाल्या. तेव्हा पाठीमागून गोरख गाडे याने त्यांच्या पाठीवर लोखंडी रॉड मारला.
त्यावेळी सनी गाडेकर, ज्ञानेश्वर गाडे, आनंद गायकवाड, अजय सिंग, गोरक्ष गाडे, भाग्यश्री घोंगडे, राधिका गाडे यांनी पोलिसांवर हल्ला केला. या टोळक्यातील महिलांनी 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. पोलिसांनी ज्यादा बंदोबस्त बोलावून यातील 7-8 जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.