इंदिरानगर व अंबड पोलिसांची मोठी कामगिरी! चेनस्नॅचिंगचे 14 गुन्हे उघडकीस ,
इंदिरानगर व अंबड पोलिसांची मोठी कामगिरी! चेनस्नॅचिंगचे 14 गुन्हे उघडकीस , "इतक्या" लाखांचा मुद्देमाल जप्त
img
सुधीर कुलकर्णी
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शहरातील इंदिरानगर व अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेनस्नॅचिंग करणार्‍या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 17 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अंबड पोलीस ठाण्यात आयोजित या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना राऊत म्हणाल्या, की पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी जबरी चोरी करणार्‍या गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे व अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार इंदिरानगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर व पोलीस अंमलदार सागर कोळी, जयलाल राठोड यांनी ट्रॅप लावून सोनसाखळीचोरांना मोठ्या धाडसाने पकडले.

त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने परवेज जावेद मणियार व विसंबा यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून इंदिरानगर परिसरातील सोनसाखळीचोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले, तसेच त्यांच्याकडून 81 ग्रॅम 290 मिलिग्रॅम सोने व एक मोटारसायकल असा एकूण 6 लाख 98 हजार 524 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला, तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेला लोखंडी धारदार कोयता हस्तगत केला आहे.

यात इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यांतील अनुक्रमे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 20 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, 10 ग्रॅम वजनाची पोत, 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा मुद्देमाल या आरोपींकडून इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतला.

त्यानंतर अंबड पोलिसांनी आरोपींना विश्‍वासात घेऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी व त्यांचे साथीदार मनोज संजय ओतारी, अक्षय सुनील बोरकर (सर्व रा. शिवाजीनगर, सातपूर) यांनी अंबड पोलीस ठाणे हद्दीत चेनस्नॅचिंग केल्याची कबुली दिली. सदर आरोपींनी चोरी केलेला मुद्देमाल कोणाला विकला, याचीही माहिती पोलीस तपासात दिली असून, त्यानुसार अंबड पोलीस ठाणे हद्दीत आरोपींनी केलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये एकूण 14 तोळे 3 मिलिग्रॅम सोने व गुन्हा करताना वापरण्यात आलेली पल्सर मोटारसायकल असा एकूण 10 लाख 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रमाणे परिमंडळ-2 मधील एकूण 14 गुन्हे उघडकीस आणून त्यात 17 लाख 58 हजार 524 रुपये किमतीचा मुद्देमाल इंदिरानगर व अंबड पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर, किरण रौंदळे, पोलीस उपनिरीक्षक भूषण सोनवणे, झनकसिंग घुणावत, पोलीस नाईक सागर परदेशी, जगझाप, मुश्रीफ शेख, योगेश जाधव, सौरभ माळी, प्रकाश पगारे, श्यामल जोशी, करंजे, गाढवे, मते, भोरे, बोडके, शिंदे, राऊत, जाधव, भोये, निकम, पाटील, राठोड, मयूर पवार व रुमाले यांच्या पथकाने केली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group