Nashik : माजी नगरसेविकेच्या घरी घरफोडी करून कोटी रुपयांचे दागिने चोरणारे अवघ्या 12 तासांत गजाआड
Nashik : माजी नगरसेविकेच्या घरी घरफोडी करून कोटी रुपयांचे दागिने चोरणारे अवघ्या 12 तासांत गजाआड
img
सुधीर कुलकर्णी

  नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- राका कॉलनीतील प्रसिद्ध डॉ. ममता पाटील यांच्या फ्लॅटमधून चोरट्यांनी तब्बल एक कोटी रुपये किमतीचे दागदागिने चोरले होते.

या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने अवघ्या बारा तासांच्या आत आरोपींचा तपास लावला असून, आरोपींनी या घरफोडीसह पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत एक व पुणे शहरातील विविध भागांत तब्बल 18 ठिकाणी चोर्‍या व घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून सोन्याची लगड, तीन मोबाईल फोन, विविध गुन्ह्यांतील 866.340 ग्रॅम वजनाचे दागिने असा 57 लाख 66 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

विशेष म्हणजे तिन्ही आरोपी नाशिकमधील सराईत गुन्हेगार असून, त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकलदेखील चोरीची होती. आरोपींपैकी अमनसिंग पंजाबसिंग टाक हा नाशिकचा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी पंचवटी, सायखेडा व इंदिरानगर या पोलीस ठाण्यांमध्ये सन 2019 पासून तीन गुन्हे दाखल आहेत.

याबाबत माहिती अशी, की पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा युनिट-1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समांतर तपासादरम्यान घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार विशाल काठे, मुक्तार शेख, अंमलदार आप्पा पानवळ, राम बर्डे यांच्या पथकाने आरोपी ज्या दिशेने बाहेर पडतात, त्या दिशेने सुमारे पाच ते सहा किलोमीटरपर्यंत अंतराचे सीसीटीव्ही फुटेज शोधून त्यांचा अभ्यास केला.

त्यानुसार तिन्ही आरोपी भीमवाडी, गंजमाळ भागातील असल्याचे दिसून आले. या भागात चौकशी केली असता ही घरफोडी गोरखसिंग टाक, दीपक जाधव व अमनसिंग टाक यांनी केली असून, ते भीमवाडी परिसरातच एमएच 15 जीजी 0251 या क्रमांकाच्या मोटारसायकलीवरून फिरत आहेत, अशी माहिती मिळाली. 

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रवींद्र बागूल, किरण शिरसाठ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे, सुगन साबरे, हवालदार विशाल काठे, प्रवीण वाघमारे, धनंजय शिंदे, योगीराज गायकवाड, प्रशांत मरकड, संदीप भांड, रमेश कोळी, प्रदीप म्हसदे, महेश साळुंके, शरद सोनवणे, देवीदास ठाकरे, राजेश लोखंडे, चालक हवालदार नाझिमखान पठाण, सुदाम पवार, पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी, विशाल देवरे, अंमलदार आप्पा पानवळ, मुक्तार शेख, राम बर्डे, विलास चारोस्कर, गंगेश्‍वर बोरसे, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, महिला पोलीस अनुजा येलवे व समाधान पवार यांच्या पथकाने भीमवाडी परिसरात तपास करून चोरलेल्या मोटारसायकलींवरून फिरणारे गोरखसिंग दादासिंग टाक (वय 35), अमनसिंग पंजाबसिंग टाक (वय 30), दीपक तुकाराम जाधव (वय 33, सर्व रा. भीमवाडी, गंजमाळ) यांना अटक केली.

यापैकी अमनसिंग टाक व दीपक जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून 56 लाख 31 हजार 310 रुपयांचे 866.340 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने व लगड जप्त केली, तसेच मोबाईल व मोटारसायकलीची किंमत धरून हीच रक्कम 57 लाख 66 हजार 210 रुपये इतकी होते. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल इंदिरानगर परिसरातील श्रीलक्ष्मी पार्क अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरल्याची कबुली त्यांनी दिली.

त्यामुळे त्यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदविला असून, आरोपींना पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पुण्यात तब्बल 18 गुन्हे

अमनसिंग टाकची टोळी आंतरराज्यीय स्वरूपाची असून, या टोळीने सन 2012 पासून पुणे शहरातील येरवडा, हडपसर, मार्केट यार्ड (दोन गुन्हे), कोंडवाडा, कोरेगाव, खडक (दोन गुन्हे), सहकारनगर, चंदननगर, अलंकार पोलीस ठाणे (चार गुन्हे), कोंढवा, स्वारगेट, तसेच चाकण पोलीस ठाणे असे पुणे शहरातील 18 पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध घरफोड्या, फसवणूक यांसह विविध कलमांन्वये विविध गुन्ह्यांची नोंद आहे, तसेच पंचवटी पोलीस ठाण्यात 2019 चा एक गुन्हा नोंद आहे, तसेच अमनसिंग टाकविरुद्ध पंचवटी, सायखेडा व इंदिरानगर या पोलीस ठाण्यांमध्ये तीन गुन्ह्यांची नोंद आहे.

75 हजारांचे बक्षीस

तब्बल एक कोटीची घरफोडी झाल्यामुळे हे वृत्त पसरताच शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व पथकाने अवघ्या बारा तासांत आरोपींचा शोध लावला. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपासी पोलीस पथकास 75 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group