मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. BMW हिट अँड रन प्रकरणीआरोपी मिहीर शहाची ब्लड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. वैद्यकीय तपासणीत रक्ताच्या नमुन्यातअल्कोहोल न मिळाल्याने मोठा धक्का बसला आहे. पोलिसांसाठी हा मोठा झटका आहे.
एका वृत्त संस्थेने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे. दुर्घटना झाल्यापासून तीन दिवस मिहीर शहा फरार होता. रक्ताची तपासणी करण्यास उशीर झाल्यामुळे ब्लड टेस्टमध्ये अल्कोहोल मिळून न आल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे हा प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. पण, आरोपीचा ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला खिळ बसण्याची शक्यता आहे.
७ जुलैच्या सकाळी आरोपी मिहीर शहा याच्या भरधाव BMW ने एका महिलेला चिरडले होते. यात कावेरीनाखवा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. धडक दिल्यानंतर कावेरी नाखवा यांना १.५ किलोमीटरपर्यंत मिहिर शहाने फरफटत नेलं होतं. चालकाचा देखील या अपघातात समावेश होता. अपघातानंतर आरोपी मिहीर शहा आणि ऋषिराज बिडावत फरार झाले होते.
मिहीर शहा हा शिंदे गटाचे पालघर जिल्ह्याचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. अपघाताच्या पूर्वसंध्येला मिहीरने जुहू येथील बारमध्ये तसेच गाडीत मद्य प्राशन केल्याचा आरोप आहे. अपघातानंतर ब्लड टेस्ट पॉझिटिव्ह येऊ नये यासाठीच तो तीन दिवस फरार झाल्याचं सांगितलं जात आहे.
मिहीर शहा याने महिलेला चिरडले होते. त्यानंतर तो आपल्या कुटुंबासोबत फरार झाला होता. त्याला एका रिसॉर्टवर सापळा रचून पोलिसांनी पकडले होते. सध्या तो कोठडीमध्ये आहे.