उद्योगांवर श्वेतपत्रिका का निघत नाही; वडेट्टीवार यांचा सरकारला प्रश्न
उद्योगांवर श्वेतपत्रिका का निघत नाही; वडेट्टीवार यांचा सरकारला प्रश्न
img
Dipali Ghadwaje
नाशिक :  महाराष्ट्राला अधोगतीकडे आणि विकासाच्या वाटेपासून रोखणाऱ्या सरकारला रोखण्यासाठी सर्वप्रथम आमचे प्राधान्य आहे. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावर निर्णय घेऊ असे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. नाशिकमध्ये आले असता ते  पुढे म्हणाले की, राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी जनतेसमोर श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून खरी परिस्थिती मांडण्याचे सांगितलं होतं. त्यांना माझें आजही आव्हान आहे त्यांनी ही  श्वेतपत्रिका जनतेसमोर मांडावीच म्हणजे खरे कोण आहे हे जनतेला कळेल.

नाशिक मध्ये विभागीय काँग्रेसच्या बैठकीसाठी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी तूपसाखरे लॉन्स येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यामध्ये केवळ अधोगती चालू आहे. आज विकासाचे राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राला अधोगतीचे राज्य म्हणून ओळख प्राप्त झालेली आहे. राज्यामध्ये असलेल्या सरकारने राज्याचा विकास थांबवला आहे, पूर्णपणे अधोगती केलेली आहे त्यामुळे विकास होत नाही. तरुणांना रोजगार मिळत नाही. यासारखे प्रश्न आजही कायम आहे, कोणत्याही विकासावर चर्चा होत नाही, विकासाच्या योजना येत नाही. हे या महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, केवळ निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ती पण मध्य प्रदेशची कॉपी करून ही योजना सुरू केली आहे. प्रत्यक्षात यांचे कोणते धोरणच नाही त्यामुळे ही योजना किती यशस्वी होईल याविषयी आजही शंका आहे. आज मध्यप्रदेशने योजना सुरू केली निवडणूक जिंकल्या पण आज तीन महिन्यापासून मध्यप्रदेश मधील लाडक्या बहिणीला सरकारने पैसे देणे बंद केले आहे. तशीच गत ही महाराष्ट्राची होणार आहे. काही दिवस पैसे मिळतील आणि पुन्हा हे पैसे देणे बंद होईल असा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, आम्ही तेलंगणामध्ये अन्नपूर्णा ही योजना आणली आहे. या योजनेला आम्ही तीन हजार रुपये दिले आणि ती योजना आजही चालू आहे आमचे सरकार आल्यानंतर या योजनेबाबत आम्ही विचार करू असेही ते म्हणाले.

आतापर्यंत सत्तावीस उद्योग हे गुजरातला गेलेले आहेत. पण यावर सरकारला बोलायला वेळ नाही. गुजरातने महाराष्ट्राला गुडघे टेकण्यासाठी भाग पाडले आणि महाराष्ट्र गुजरात समोर नाक घासत आहे. यासारखी शोकांतिका कुठली नाही, याची खंत व्यक्त वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, या उलट महाराष्ट्रला काय मिळालं तर ड्रग, गुटखा आणि महाराष्ट्रातील समाज हा उध्वस्त करण्यासाठी जे जे पाठवता येईल ते त्या गोष्टी त्यांनी पाठविले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारने गुजरात समोर काय उद्योग केलेले आहेत हे सर्वांसमोर झालेले आहे. विधिमंडळामध्ये राज्याचे उद्योग मंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भामध्ये सांगितले होते पण आज सरकारची मुदत संपत आली तरी देखील श्वेतपत्रिका निघालेली नाही कारण त्यांच्याकडे जी माहिती आहे ती सर्वांसमोर आली तर सरकारच्या प्रतिमेला धक्का बसेल आणि सरकारचा अधिपतन होईल ही भीती असल्यामुळे आजही ते श्वेतपत्रिका काढण्यास तयार नाही. मी त्यांना आवाहन देतो की त्यांनी ही श्वेतपत्रिका काढावी म्हणजे सर्वांनाच काय आहे याची माहिती मिळेल.

राज्याच्या मुख्यमंत्री कोणी व्हावं यापेक्षा आत्ताचे सरकार आहे हे विनाशकाली सरकार घालविण्यासाठी प्रयत्न करणे आणि जनतेचे आशीर्वाद मिळवणे राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही तेच केलं आणि आता विधानसभा निवडणुकीला ही आम्ही तेच करणार आहोत, असे त्यांनी सांगितले
इतर बातम्या
Join Whatsapp Group