लासलगाव (वार्ताहर) :- नाफेड, एनसीसीएफच्या माध्यमातून केंद्र सरकारने पाच लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी केलेला हा कांदा देशांतर्गत दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, भुवनेश्वर आणि अहमदाबाद या सारख्या मेगा-मेट्रोसिटीमध्ये उपलब्ध करण्यास सुरुवात केल्याने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात 700 रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.
आज लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात 383 वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता. त्या कांद्याला जास्तीत जास्त 4001 रुपये, कमीतकमी 1500 रुपये तर सरासरी 3800 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. काल 603 वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता त्या कांद्याला जास्तीतजास्त 4700 रुपये, कमीतकमी 2000 रुपये तर सरासरी 4100 रुपये प्रतिक्विंटल मिळाला होता.
केंद्र सरकारच्या या कांद्याच्या राजकारणामुळे कांद्याच्या दरामध्ये नियमित चढउतार होत असल्याने आम्हा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. यामुळे कुटुंबाचे उदारनिर्वाह करणे, घेतलेले कर्ज फेडणे आणि पुढील पिकाचे नियोजन करणे अश्या गोष्टींवर परिणाम होत असल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नियोजन केले पाहिजे, असे मत कांदा उत्पादक शेतकरी सागर शिंदे यांनी व्यक्त केले.