पुणे (भ्रमर वृत्तसेवा) :- एका मद्यपीचालकाने बेदरकारपणे कार चालवून पाच जणांना चिरडले. त्यात एक वृध्दाचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. विश्वनाथ उपादे (वय 65) असे कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात असून मद्यपी कारचालकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. नारायण पेठ पोलीस चौकी ते झेड ब्रिज हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे, या ठिकाणी भरधाव वेगाने वाहने जात असतात. त्यातच नारायण पेठ पोलीस चौकीकडून चारचाकी वाहन झेड ब्रिजच्या दिशेने आलेल्या उमेश वाघमारे (वय 48) या कारचालकाने दोन रिक्षांना धडक दिली, तसेच काही पादचाऱ्यांना उडवले. नटराज सूर्यवंशी (वय 44 ) यांच्या मालकीची ती कार असून उमेश वाघमारे हा त्यांच्याकडे चालक म्हणून कामाला आहे.
उमेश याने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाल्याची प्राथामिक माहिती अपघाताची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तडीने घटनास्थळी धाव घेतली. मद्यपी कारचालक उमेशला लोकांनी पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या हवाली केले.