जगप्रसिद्ध तिरुपतीचे लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात जनावरांची चरबी 'बीफ टॅलो' , 'लार्ड' (डुक्कराच्या चरबीशी संबंधित) आणि फिश ऑईल असल्याची पुष्टी गुजरातच्या पशुधन प्रयोगशाळेने केली आहे, असा दावा सत्ताधारी तेलुगू देसम पक्षाने गुरुवारी केला.
टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत प्रयोगशाळेचा कथित अहवाल सादर केला. नमुने स्वीकारण्याची तारीख ९ जुलै २०२४ होती आणि प्रयोगशाळेचा अहवाल 16 जुलै चा होता. तिरुपतीच्या प्रसादातील तुपात चरबीचे अंश आढळल्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, गायीला व्याधी असतील तर नैसर्गिकरित्या दुधामध्ये चरबीचे अंश येऊ शकतात, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान , तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंवरुन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विरोध पक्ष वायएसआर काँग्रेसवर आरोप केले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती देवस्थानाच्या प्रसादाबद्दल गंभीर आरोप केला होता. नायडू यांचे कट्टर विरोधक आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर व्हायचा, असा अतिशय धक्कादायक आरोप नायडू यांनी केला होता.