आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीचा आणि पाम तेलाचा वापर केला गेला होता. असा आरोप आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्ष टीडीपीने 18 सप्टेंबर रोजी राज्यातील वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप आणि फिश ऑइल मिसळल्याचा आरोप केला होता. दुसऱ्या दिवशी, टीडीपीने प्रयोगशाळेचा अहवाल दाखवला आणि आपल्या आरोपांची पुष्टी केल्याचा दावा केला.
दरम्यान , आता या वादानंतर आता आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे (तिरुपती मंदिर) शुद्धीकरण करण्यात आले. यासाठी महाशांती यज्ञ केला गेला. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) मंडळाच्या अधिका-यांसह 20 पुजारी सोमवारी सकाळी 6 ते 10 पर्यंत चाललेल्या पंचगव्य परीक्षण (शुद्धीकरण) मध्ये सहभागी झाले होते. विधीमध्ये लाडू आणि अन्नप्रसादम स्वयंपाकघर शुद्ध करण्यात आले.
तसेच , आता तिरुपती मंदिरातील लाडूंच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. सीएम चंद्राबाबू नायडू म्हणाले की, एसआयटीच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल. दुसरीकडे, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रसादममध्ये प्राण्यांच्या चरबीच्या वापराची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी स्वामी यांनी केली आहे. राज्यसभा सदस्य आणि देवस्थानम (TTD) चे माजी अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची मागणी केली आहे.