भोर तालुक्यातील बाजारवाडी येथील रहिवासी शेतकरी धनंजय रघुनाथ पोळ यांनी यांनी आपल्या राधा या गाईचे वर्ष श्राद्ध थाटामाटात केले. या गोमातेचे निधन वर्षांपूर्वी झाले होते. त्यांच्या घरी खिलार जातीची गाय राधा नावाची गाय होती. वासरू ते 10 वर्षांच्या सहवासात राधा गायी ही पोळ कुटुंबाची सदस्य बनली. राधा हिचा मृत्यू झाला. मात्र, तिच्या मृत्यूनंतर घरातील एक सदस्य गेला. या भावनेतून तिचे दहावे, तेरावे आणि आता प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी थाटात करण्यात आला. एकीकडे माणसा माणसातील नाती कमकुवत होत असताना प्रगतशील शेतकऱ्याने एक अनोखा आदर्श घालून दिला आहे.
गायीचे आणि शेतकऱ्याचे अतुट नाते असते. शेतकरी आपल्या गायींना जीवापाड जपतात. प्रेम करतात. घरातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात. शेतकरी हा आपल्या गायीच्या भरोशावर प्रपंचाचा गाडा हाकतात. पण त्या गायीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे त्यांनीही राधा या लाडक्या गायीचा माणसांप्रमाणे वर्ष श्राद्ध विधी केला. जसे माणूसाचा मृत्यू झाल्यानंतर सर्व विधी पार पाडतात, त्याचप्रमाणे 10 वर्षे मुलीप्रमाणे सांभाळलेल्या राधा गायीचा मृत्यू झाल्यानंतर सर्व विधी पार पाडण्यात आले.
महिला सबलीकरणाच्या पुरस्कर्त्या, राष्ट्रीय किर्तनकार नेहा भोसले साळेकर यांनी सुश्राव्य किर्तनात गाय आणि आई हेच फक्त निस्वार्थ प्रेम करु शकते या शब्दात गाईचे महत्त्व विशद केले. यावेळी गायीची विधिवत पूजा करून, सुहासिनींनी औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. 21 गायींना पुरणपोळी चारण्यात आली.
तसेच खिलार जातीची गायी ज्यांच्याकडे आहे अशा 21 शेतकऱ्यांना हरिपाठाची पुस्तके भेट देत टॉवेल, टोपी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. वर्ष श्राद्ध निमित्ताने संपूर्ण गावाला श्रीखंड पुरीचे गाव जेवण देण्यात आले. जेवणांनंतर भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. वर्षश्राध्दाच्या विधीसाठी सातारा, रायगड, पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी, नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे.