वाराणसी येथे सनातन सक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी बडा गणेश मंदिरासह जवळपास 10 मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आली आहे. हिंदु धर्म शास्त्रात साईबाबांची पुजाविधी नाही. त्यामुळे साईंची पुजा करू नये, अशी मागणी सनातन रक्षक दलाची आहे. या घटनेमुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे .
सनातन धर्माला समर्पित मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्ती स्थापित करण्याविरुद्धच्या मोहिमेत आघाडीवर असलेले सनातन रक्षक सेनेचे अध्यक्ष अजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या एका आंदोलनाचा भाग म्हणून या मूर्ती हाटविण्यात आल्या आहेत. शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, लाखो लोक पूज्य मानणारे शिर्डी साई बाबा त्यांच्या पार्श्वभूमीमुळे सनातन मंदिरांचे सदस्य नाहीत. तसेच त्यांची मुळे इस्लाममध्ये रुजलेली आहेत, असे अनेकांचे मत आहे. पुढे बोलताना त्यांनी, जोर देऊन सांगितले की, "आम्ही साईबाबांच्या किंवा त्यांच्या अनुयायांच्या विरोधात नाही, परंतु सनातन धर्माच्या मंदिरांमध्ये त्यांच्या मूर्तींना स्थान नाही".
दरम्यान, 2014 पासून साईबाबांच्या पुजेला विरोध सुरू झाला. त्यावेळचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी हिंदुनी साईबाबांना देव मानू नये आणि त्यांची पुजा करू नये, असं आवाहन केलं होतं. त्यावेळी मोठा वाद उपस्थित झाला होता. त्यावेळी शंकराचार्य यांच्या उपस्थितीत धर्म संसद भरवण्यात आली होती. त्यातही साईबाबांची पुजा करू नये, असं ठरवण्यात आलं होतं.
त्याबाबत चर्चा करावी...
“हिंदू धर्मात संतांचा सन्मान केला जातो. साईबाबांनी कधीही आपली जात, धर्म, पंथ कोणास सांगितला नाही. साईबाबांनी आपल्या हयातीत अनेक साक्षात्कार दाखवले. त्यामुळे साईभक्त त्यांना देव मानतात. वाराणसी येथील साईंची मूर्ती किंवा प्रतिमा हटवणे निषेधार्ह असून ज्यांना काही गैरसमज झाला असेल त्यांनी साईंबाबांच्या जीवनावर आधारित साईसतचरित्र ग्रंथ वाचावा किंवा आमच्याशी त्याबाबत चर्चा करावी. आम्ही त्यांचे समाधान करू”, असं माजी ट्रस्टी आणि ग्रामस्थ सचिन तांबे यांनी म्हटलं आहे.