मालेगाव येथे डाळिंब इस्टेट स्थापनेला मंत्रिमंडळाची मान्यता, पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केला होता पाठपुरावा
मालेगाव येथे डाळिंब इस्टेट स्थापनेला मंत्रिमंडळाची मान्यता, पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केला होता पाठपुरावा
img
दैनिक भ्रमर
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील निळगव्हाण येथे 5.78 हेक्टर क्षेत्रात डाळिंब इस्टेट स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी ५३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. डाळिंब इस्टेट मंजूर झाल्याबद्दल पालकमंत्री श्री. भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील 30 हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब फळबाग लागवडीखाली आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, देवळा परिसरातील वातावरण डाळिंब पिकास पोषक आहे. डाळिंब इस्टेट स्थापना करून डाळिंब ज्यूस उत्पादित करणे तसेच डाळिंबाचे दाणे वेगळे करून फ्रोजन करून निर्यातीस चालना देणे, डाळिंब फळ प्रक्रिया साठवण, पॅकेजिंग, मार्केटिंग यासाठी प्रशिक्षण व विस्तार केंद्रास मान्यता देणे या उद्देशाने डाळिंब इस्टेट स्थापना येणार आहे. त्यासाठी 53 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
या इस्टेटमुळे डाळिंबाची उत्पादकता वाढवण्यास मदत होईल. तसेच साठवणूक व प्रक्रिया सुविधांचा विस्तार केला जाईल. याबरोबरच निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण कलमे विकसित करण्यासाठी मदत होऊन जिल्ह्यातील डाळिंब उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे  आर्थिक उत्पन्न सुद्धा वाढेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. भुसे यांनी व्यक्‍त केला आहे.

मालेगाव तालुका डाळिंब उत्पादनात आघाडीवर आहे. तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रात डाळिंबाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी उत्पादन क्षम १३ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मागील दोन वर्षांपासून डाळिंबास चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा डाळिंब उत्पादनाकडे कल वाढला आहे. तालुका फळ रोपवाटिका निळगव्हाण हे नाशिक जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण, नांदगाव, येवला तसेच शेजारील धुळे जिल्ह्यातील साक्री व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काष्टी येथील कृषी संकुलातील शास्त्रज्ञांच्या तंत्रज्ञान पथकाचा डाळिंब इस्टेट प्रकल्पात सक्रिय सहभाग घेऊन संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर अवलंब करण्यास सोयीचे होणार आहे. 

डाळिंब इस्टेटच्या स्थापनेमुळे एकाच छताखाली डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सुविधा उपब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच निळगव्हाण येथील प्रक्षेत्राचे डाळिंब इस्टेटमध्ये रूपांतर होणे गरजेचे होते. त्यासाठी पाठपुरावा सुरू होता, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी म्हटले आहे. डाळिंब इस्टेटच्या माध्यमातून रोगमुक्त व गुणवत्तापूर्ण डाळिंब कलमांची निर्मिती करणे, निर्यातीसाठी नवीन वाणाची आवश्यकता व निर्यातक्षम उत्पादन करणे, प्रक्रिया, स्थानिक बाजारपेठ व खाण्याकरीता वाणनिहाय शिफारशी करणे, वाजवी दरात यांत्रिकीकरणाची सुविधा निर्माण करणे, डाळिंब लागवडीसाठी इंडो- इस्त्राईल तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, काढणी पश्चात व्यवस्थापन सुविधा निर्माण करणे, मृद, पाणी, ऊती व पाने परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करून शेतकऱ्यांना सुविधा निर्माण करून देणे व त्याप्रमाणे शिफारशी करणे, निविष्ठा विक्री केंद्रातून वाजवी दरात शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध करून देणे, डाळिंब इस्टेट प्रकल्पांतर्गत डाळिंब ज्यूस, फ्रोझन डाळिंबाचे उत्पादन, साठवणूक व विक्री निर्यात व ब्रॅण्डिंगसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान संकुल काष्टी येथील फलोत्पादन, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबविण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group