कळवण-प्रतिनिधी:-आद्यस्वयंभु, आदिमाया सप्तशृंगी देवाच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून ट्रस्ट प्रशासना नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेची पंचामृत महापूजा प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद डी जगमलानी हस्ते होणार आहे. तत्पुर्वी पहाटे सहा वाजेच्या ट्रस्टच्या मुख्यकार्यालयात देवीच्या आभूषणांचे पूजन ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश बी व्ही वाघ यांच्या हस्ते होणार आहे. त्यांनतर या आभूषणांची ट्रस्टच्या मुख्यकार्यालयातून सवाद्य मिरवणूक निघणार आहे.
हे आभूषणे सुरक्षितपणे मंदिरात नेण्यात येतील. यजमानांच्या प्रमुख उपस्थितीत पंचामृत महापूजा व आरती होईल. त्यानंतर श्री भगवती मंदिरात घटस्थापना करण्यात येणार आहे.
यावेळी ट्रस्ट विश्वस्त ॲड. ललित निकम, ॲड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर उपस्थिती राहणार आहेत. नवरात्रोत्सवाच्या दृष्टीने विविध ठिकाणची स्वच्छता करण्यात आली आहे. भाविकांच्या निवास व्यवस्था नेहमी प्रमाणे कार्यान्वित असणार आहे त्यासोबतच शिवालय परिसरात भाविकांसाठी वॉटर प्रूफ निवारा शेड उभारण्यात आला आहे.
उत्सव कालावधीत भाविकांसाठी ट्रस्टच्या अन्नपूर्णा प्रसादालयात मोफत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. ठीकठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसर, डोम व ट्रस्टच्या इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अशी माहिती ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांनी दिली.