अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड
img
दैनिक भ्रमर
 ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. या वर्षी दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. आज पुण्यात मसापमध्ये झालेल्या बैठकीत ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले.

सरहद, पुणे आयोजित दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलन २१,२२ आणि २३ फेब्रुवारी रोजी तालकटोरा स्टेडिअम, दिल्ली येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या व लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक व लेखिका डॉ. तारा भवाळकर यांची एकमताने निवड करण्यात आली

या बैठकीस अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, राजन लाखे, प्रदीप दाते, विलास मानेकर, गजानन नारे, दादा गोरे, रामचंद्र कालुंखे, किरण सगर, कपूर वासनिक, संजय बच्छाव, विद्या देवधर यावेळी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण आणि ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन दुपारी चार वाजता होणार आहे. सायंकाळी निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका नामवंताची मुलाखत होणार आहे.

तारा भवाळकर यांचा लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांचा गाढ्या अभ्यास आहे. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललितलेखन, लोककला आणि लोकसाहित्य या विषयावर पुष्कळ संशोधन आणि विपूल लेखन केले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सातव्या महिला ठरल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group