प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना अमरावती मधून समोर आली आहे . या घटनेत दोन तरुणींचे एकाच युवकावर प्रेम असल्याने एका तरुणीने दुसऱ्या तरुणीची हत्या केली असल्यासाची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
अमरावतीच्या राजापेठ ठाण्याच्या हद्दीत 26 वर्षांच्या युवतीची हत्या करण्यात आली आहे. अमरावती शहरात मागच्या 36 तासांमधली ही दुसरी हत्या आहे. दुहेरी प्रेम प्रकरणातून एका युवतीने दुसरीला चाकूने वार करून संपवल्याची घटना अमरावतीमध्ये घडली आहे. शुभांगी काळे असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव असून तिचं वय 26 वर्ष आहे
या विषयी अधिक माहिती अशी की, शुभांगी काळे ही वर्धा जिल्ह्यातील आर्वीची रहिवासी आहे. अमरावतीमध्ये सोसायटीच्या मागे शुभांगीवर सपासप चाकूने वार करण्यात आले, यानंतर शुभांगीने आरडाओरडा केला, त्यामुळे हल्ला करणारी दुसरी युवती तिथून पसार झाली.
परिसरातील नागरिकांनी शुभांगीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. शुभांगीची हत्या माया नगर येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षांच्या युवतीने केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकास सुरज नावाच्या युवकाला ताब्यात घेतलं आहे. तर आरोपी युवती सध्या पसार झाल्याची माहिती आहे.
शुभांगी आणि हत्या करणारी युवती या दोघींचंही एकाच युवकावर प्रेम होतं, या प्रेम प्रकरणातूनच शुभांगीची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात सध्या हत्येच्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागच्या 36 तासांमधली ही अमरावती शहरातील पाचवी हत्या आहे, त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण आहे.