मुंबई : ललित पाटीलला बेड्या ठोकल्यानंतर साकीनाका पोलिसांनी रात्री उशिरा ललितच्या चालकाला अटक केली. सचिन वाघ (वय 30) असे या चालकाचे नाव आहे.
ललित पाटीलने ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर सचिन वाघने विविध राज्यांत घेऊन जाण्यासाठी मदत केली होती. गेल्या काही दिवसांपासून वाघ ललित पाटीलला सतत मदत करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
ललित पाटीलच्या ड्रग्ज रॅकेटचा विस्तार फार मोठा असल्याचा अंदाज पोलीस वर्तवत आहे. काल ललितच्या दोन मैत्रीणींना अटक करण्यात आली होती. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या ललितला साथ देत असल्याचे तपासात उघड झाले. त्यांना आता 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रज्ञा ही ललित पाटीलची प्रेयसी होती. ती ललित पाटीलचे ड्रग्ज रॅकेट चालवण्याचे प्लॅनिंग करत होती. दोघे पुण्यातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेटायचे. ललित आणि प्रज्ञा या दोघांचे व्हायरल झालेल्या फोटोंमधून ललित अनेक वेळा तिच्या समवेत असल्याचे उघडकीस आले. ससूनमधील खिडकीत बसून तो सिगारेट ओढतानाचा देखील फोटो व्हायरल झाला होता.
ललितने पोलिसांना सांगितले की, 2021 पासून नाशिकच्या शिंदे गावात एमडीचे उत्पादन सुरू होते. दर महिन्याला या ठिकाणाहून 50 किलो एमडीची निर्मिती केली जात होती. या एमडीचा सप्लाय मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये केला जात होता.
ड्रग पेडलर्सच्या नेटवर्कच्या मदतीने हा एमडीचा पुरवठा होत होता. यातून ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील दर महिन्याला तब्बल 50 लाख रुपयांचा नफा कमावत होते. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 16 आरोपींना अटक केली आहे. आणखी यात कोणी गुंतलेले आहे का? याचा शोध पोलीस घेत आहे.
ललित पाटील याच पैशांच्या जोरावर हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करत असल्याचे समोर आले आहे. तसेच ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना तो सातत्याने पैसे देत होता. ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत होता आणि ससूनच्या बाहेर जाऊन बैठका घ्यायचा, अशी माहितीही त्याने पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.