"…अन् दोघांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली" ' नेमकं काय घडलं? वाचा स्थगितीची इनसाईड स्टोरी
img
Dipali Ghadwaje
मुंबई : पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीवरून महायुतीत वादाला सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे, यासाठी भरत गोगावले आग्रही होते परंतु त्यांना डावलून आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद दिल्याने आणि नाशिकचे पालकमंत्रिपद दादा भुसे यांना हवे असताना ते गिरीश महाजन यांना दिल्याने शिवसेनेमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीस स्थगिती दिलेली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावर गेले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूभूमीवर आणि दावोसला रवाना होण्यापूर्वी त्यांनी पालकमंत्रिपदाचा विषय मार्गी लावला. मात्र शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांना हवे असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद न दिल्याने रोष व्यक्त करण्यात येत होता. भाजप मनमानी करत असल्याचीही शिवसेनेमध्ये चर्चा झाली. भुसे आणि गोगावले यांनी यासंदर्भाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले आणि दादा भुसे यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची विनंती केली.

भरत गोगावले समर्थकांचे आंदोलन आणि दादा भुसे यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याला नाशिकला पालकमंत्रिपद नाकारणे, असा मेसेज पक्षात चांगला जाणार नाही, असे शिंदे यांनी फडणवीस यांना कळविले. उभय नेत्यांच्या चर्चेतून आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीस स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पालकमंत्रिपदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच होती तर रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत पालकमंत्रिपदावरून वाद होते. दोन्ही पक्षातील नेते ऐकायला तयार नसल्याने आणि पालकमंत्रिपदाचा हट्ट धरून बसलेले असताना नियुक्तीस स्थगिती देण्याचा मार्ग फडणवीस यांनी अवलंबला.
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group